अक्षर प्रदर्शन कला रसिकांना कायमस्वरुपी पहायला मिळावे: राज शिंगे…

तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला भेट_

*💫कणकवली दि.१९-:* संदेश पत्र संग्रह जोपासण्यामागे आपली नाविन्यपूर्ण  कल्पना आहे. विशेष म्हणजे या संग्रहाचे अत्यंत कष्टपूर्वक केलेले जतन वाखाणण्याजोगे आहे. या संग्रहाचे कायमस्वरुपी जागेत अक्षर प्रदर्शन सर्व कला रसिकांना भविष्यात पहायला मिळायला हवे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द चित्रकार राज शिंगे यांनी केले. ते तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला भेट दिली त्यावेळी बोलत होते.  मुंबई येथील सुप्रसिध्द चित्रकार राज शिंगे यांनी नुकतीच तळेरे येथील अक्षर घराला भेट दिली. राज शिंगे आणि माणिक शिंगे हे पती पत्नी चित्रकार आहेत. त्यांची राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शने होतात. त्यांचे महात्मा गांधी हे मांडणी शिल्प 2005 च्या जागतिक ‘बीएनाले’मध्ये मांडण्यासाठी भारतातून निवडण्यात आले होते. ते शिल्प चीनच्या संग्रही आहे.  संदेश पत्र हा संग्रह पाहताना शिंगे यांनी विविध कलावंत मित्रांच्या आठवणी जागवल्या. त्यावेळी या संग्रहाचे कौतुक करत विविध सुचनाही केल्या. ते म्हणाले की, आपण जतन केलेला हा खजिना अनमोल आहे. अत्यंत दुर्मीळ असा हा ठेवा जपा. भविष्यात त्याला निश्चीत मोल प्राप्त होईल. असे सांगतानाच पोस्टकार्डच्या कल्पनेचे विशेष कौतुक केले.  पोस्टकार्डवर घेतलेल्या संदेश पत्राच्या नाविन्यतेचे त्यांनी भरभरुन कौतुक करुन या संग्रहाच्या भविष्यातील संकल्पने विषयी जाणुन घेतले. हा व्यासंग खूपच चांगला असल्याचे त्यावेळी राज शिंगे म्हणाले.  या अक्षरघरात परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे. याशिवाय या अनोख्या संग्रहाबद्दल निकेत पावसकर यांची सह्याद्री वाहिनीसह सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्र यावर मुलाखतही प्रसारित झाली आहे. भारतीय पोस्टकार्डवर देशातील तसेच परदेशातील नामवंत व्यक्तिंचे संदेश पाहून त्याचेही चित्रकार राज शिंगे यांनी कौतुक केले. 1500 व्यक्तींचे संदेश या पोस्ट कार्डवर असल्याने भारतीय पोस्ट कार्ड केवळ देशापुरतेच मर्यादीत न राहता थेट हॉंगकॉंग, बांगलादेश, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे जाऊन पोहोचले असून हा भारतीय पोस्ट विभागाचा मोठा गौरव असल्याचे उदगार काढले.

You cannot copy content of this page