कोकण समन्वयक अर्पिता मुंबरकर यांचे सहभागी होण्याचे आवाहन
*💫कणकवली दि.१९-:* व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने राजमाता जिजाऊ स्मृतिदिन 17 जून ते राजर्षी शाहू महाराज जयंती 26 जून दरम्यान (पुरोगामी महाराष्ट्रात प्रतिगामी निर्णय!! दारूबंदी व्यसनमुक्तीसाठी आम्ही निर्भय!!) राज्यव्यापी अभियान राबविले जाणार आहे या अभियानात आपण सर्वांनी सहभागी होऊन जिल्ह्यातील समन्वय मंचाचे सर्व सहकारी तसेच सुजाण नागरिकांनी महिलांनी युवकांनी या अभियानाला पाठिंबा द्यावा असे आवाहन व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या कोकण विभाग समन्वयक, तसेच नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे. हजारो महिलांनी अनेक वर्ष संघर्ष करून चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी आणली आणि आता ती दारूबंदी उठविण्याचा निर्णय पुढारी मंडळी घेतात. ही बाब निषेधाची आहे, दारूबंदीसाठी लढा दिलेल्या महिलांचं आणि व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण आणि अपमान या दारु बंदी उठविण्याच्या निर्णयामुळे झालेलं आहे. खरंतर राज्याच्या व्यसनमुक्ती धोरणात दारूचा पुरवठा कमी कमी करत नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे, मात्र हे पुढारी मंडळी पुरवठा कमी न करता दारूबंदी उठवून आया बहिणीचे संसार उठवत आहेत याचा निषेध आम्ही नोंदवत आहोत. सिंधुदुर्गाचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. इथे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजेच. पर्यटनाला आमचा मुळीच विरोध नाही. पण आज प्रत्येक गावात पर्यटनाच्या नावावर दारूचा व्यापार चालतो आणि याचा परिणाम इथल्या महिलांच्या, युवकांच्या आणि आरोग्य व्यवस्थेवर होताना दिसत आहे. पर्यटनाच्या नावावर व्यसनांचे उदात्तीकरण होताना दिसत आहे. हे होऊ नये, यासाठी आम्ही शासनाकडे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने महाराष्ट्राची व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल व्हावी, अशी मागणी सातत्याने करत आहोत. हे करत असतानाच चंद्रपूर जिल्हात दारूबंदी उठविले जात आहे, ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभनीय नाही. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते विदर्भातील कार्यकर्ते आणि एकूणच व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने जो निर्णय घेऊन कृती कार्यक्रम ठरविण्यात येईल त्याला समन्वय मंचाची प्रतिनिधी म्हणून माझा पाठिंबा आहेच. शिवाय आमच्या पंचशील महिला मंडळ मिठमुंबरी यांचा देखील पाठिंबा आहे, असे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या कोकण विभाग समन्वयक, तसेच नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
