कोवीड सेंटरमधून पळून जाणारा परप्रांतीय रुग्ण वैभववाडी रेल्वे स्टेशनवर सापडला

पुन्हा सांगूळवाडी कोवीड केअर सेंटरमध्ये केली रवानगी

*💫वैभववाडी दि.१९-:* कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या परप्रांतीय रुग्णाचा पळून जाण्याचा प्लॅन पोलीस आणि डॉक्टर यांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. त्या कोरोना रुग्णाला वैभववाडी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी पकडले आणि त्याची रवानगी पुन्हा सांगूळवाडी कोवीड केअर सेंटरमध्ये केली आहे. वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव व कोवीड सेंटरमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या सतर्कतेमुळे त्या पळालेल्या रुग्णाला वैभववाडी रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून पुन्हा सेंटरमध्ये दाखल केले आहे. ही घटना शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली.तो परप्रांतीय सांगुळवाडी येथील कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत होता. तत्पूर्वी तो नाधवडे येथे भाड्याच्या घरात इतर कामगारांसोबत राहत होता. शनिवारी सकाळी 7 वा. च्या सुमारास सेंटर मधून तो पळाला. याची माहिती कार्यरत असणाऱ्या डॉ. राजेंद्र पाताडे यांना समजली. रुग्ण हा स्थानिक नसून तो परप्रांतीय असल्याची माहिती डॉ. पाताडे यांना होती. तो रुग्ण ट्रेनमधून मुंबईला गेला तर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पाताडे यांनी पो. नि. अतुल जाधव यांना सांगितले. त्यांनी तात्काळ पोलीस रेल्वे स्थानकाकडे रवाना केले. पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय काशीद, होमगार्ड आचरेकर यांनी प्लॅटफॉर्मवर त्या रुग्णाची शोधाशोध केली. दरम्यान मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस काही मिनिटात स्टेशनवर दाखल होणार होती. मात्र त्यापूर्वीच काशीद यांनी प्लॅटफॉर्मवर दडून बसलेल्या त्या रुग्णाला ताब्यात घेतले. डॉ. पाताडे हेदेखील स्टेशनवर उपस्थित होते. अखेर स्टेशनवरून त्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून पुन्हा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page