*जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
*💫मालवण दि.१५-:* पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात नागरिकांना गमबुट, पावसाळी पादत्राणे आदी वस्तूंची गरज असते, त्यामुळे अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंमध्ये पावसाळी पादत्राणांचा सामावेश करून या वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मागणीनुसार ब्रेक द चेन अंतर्गत शाकारणी व पावसाळी गरजेच्या वस्तूंची दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे; त्याबद्दल व्यापारी महासंघ आभारी आहे. सध्या सिंधुदुर्गात पावसाने झोड उठवली आहे आणि याच वेळी शेतकरी व जनसामान्यांच्या पावसाळी गरजेच्या पादत्राणांची विक्री करणारी दुकाने बंद असल्याने सर्वांची मोठीच अडचण होत आहे. याबाबत ‘पावसाळी पादत्राणांची दुकाने सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन या पुर्वीच जिल्हा फुटवेअर असोसिएशनने जिल्हा प्रशासनास सादरही केले आहे. त्यामुळे पावसाळा लक्षात घेता गमबूट,पावसाळी पादत्राणे आदी वस्तूंचा समावेश अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंमध्ये करून अशा वस्तूंची विक्री करणारी दुकाने नियमानुसार सुरू करण्याचे आदेश तातडीने निर्गमित करावेत, अशी मागणी अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केली आहे.
