अन्यथा ६जुलै ला उपोषण करण्याचा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा इशारा
आंबोली : आंबोली घाटातील प्रलंबित कामे न करणे दुर्लक्ष करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची बदली करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ६ जुलै रोजा उपोषण छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात चव्हाण यांनी म्हटले की, आंबोली घाटात दरडी कोसळू नये म्हणून घाटातील दरवर्षी साफ केल्या जातात. मात्र यावर्षी अद्याप काहीही केले नाही. घाटातील गटारी पालापाचोळा, दगड व मातीने भरल्याने दिसत नाहीत. त्यामुळे वरच्या भागातून येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंबोली गावातही साईडपट्टी व गटारीचे काम अद्याप झाले नाही. आंबोली ग्रामपंचायतीनेही या संदर्भात पत्र दिले होते. आंबोली घाटात धबधब्याच्या बाजूला कोसळलेली दरड कित्येक दिवस हटविण्यात आली नाही. पालकमंत्री उदय सामंत यांनी वन आणि बांधकाम विभागाला नियोजन बैठकीत धोकादायक झाडे तोडण्याचे आदेश दिले, मात्र अद्यापही झाडे तोडण्यात आली नाहीत. आंबोली हिरण्यकेशी फाटा येथे गेल्यावर्षी पुलाची मोरी तुटली होती, या ठिकाणी वारंवार सांगूनही मोरी दुरुस्ती करण्यात आली नाही. सध्या पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यातील कोणतीही आपत्कालीन यंत्रणा सज्ज नाही. आंबोली घाटातील कोणतीही कामे न करता कामचुकारपणा करून धोकादायक स्थिती ठेवणे, लोकांच्या तक्रारी आणि नेमून दिलेल्या कामांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणाऱ्या.अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी व त्याठिकाणी विजय चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी आणि कार्यक्षम अशा अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच संबंधित शाखा अभियंत्यावर कारवाई करावी यासाठी बांधकाम कार्यालयासमोर ६ जुलै रोजी उपोषण छेडणार असल्याचा इशारा चव्हाण दिला
