अजित सांगेलकर यांची मागणी पोलिसांना निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील जिमखाना मैदान, बागेचा पार्किंग परिसर, स्वामी पूल व आजूबाजूच्या परिसरात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मद्यपान करणाऱ्यांकडून महिलांशी व मुलींशी गैरवर्तन तसेच शिवीगाळ, भांडणे आणि अश्लील बोलण्याचे प्रकार घडत असल्याने या परिसरात पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी जिमखाना मित्रगृपच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिमखाना मित्रगृपचे अध्यक्ष अजित सांगेलकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिमखाना मैदान परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते. मद्यपान करणाऱ्यांकडून बाटल्या व इतर कचरा परिसरात टाकला जात असून, काही ठिकाणी महिलांना व मुलींना पाहून अश्लील शेरेबाजी तसेच गैरवर्तन केले जाते. त्यामुळे महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच जिमखाना मैदान परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असून, काही वाहनचालकांकडून मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकारही होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी या परिसरात नियमित गस्त वाढवून मद्यपान करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या वाहनांची तपासणी करून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
