Headlines

सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेची भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी…

राजू कासकर: पाणीपुरवठा विभागात झालेल्या घोटाळ्याबाबत जनतेला माहिती न दिल्यास मनसे रस्त्यावर उतरणार..

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणे काम न करता प्रशासकीय भूमिका पारदर्शकपणे पार पाडावी, अशी मागणी मनसेचे सावंतवाडी शहर अध्यक्ष राजू कासकर यांनी केली आहे.
शहरातील कथित पाणीपुरवठा घोटाळ्यासह विविध विकासकामांबाबत नगरपरिषदेने सावंतवाडीकरांना वस्तुस्थितीची माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सावंतवाडी शहरात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक वादग्रस्त कामांबाबत मनसे, नागरिक तसेच नगरपरिषदेतील विरोधी पक्षाकडून वेळोवेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शहरातील पाणीपुरवठा पाइपलाइन तसेच गॅस पाइपलाइनसाठी करण्यात आलेल्या रस्ते खोदाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यातच आता नवीन पाणीपुरवठा योजनेतील कथित गैरप्रकाराचा मुद्दा पुढे आला आहे.
एप्रिलनंतर रस्ते खोदाई बंद ठेवण्याचे आदेश असतानाही काही ठिकाणी काम सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच सावंतवाडी मोती तलावातील कारंजे की लेझर शो, यासह विविध विषयांवर मुख्याधिकाऱ्यांकडून आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती जनतेसमोर मांडण्याची मागणी करण्यात आली आहे.या सर्व प्रश्नांबाबत मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी. संबंधित कामांमध्ये नियमांचे पालन झाले आहे की नाही, तसेच तक्रारींबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली, याची माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे मनसेने म्हटले आहे.
दरम्यान, या प्रश्नांवर नगरपरिषदेने समाधानकारक भूमिका स्पष्ट न केल्यास येत्या काळात नागरिकांना सोबत घेऊन सावंतवाडी नगरपरिषदेविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

You cannot copy content of this page