⚡कुडाळ ता.०४-: क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अनिल नेरूरकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी विद्यार्थ्यांनी या महान व्यक्तिमत्त्वांचे आदर्श आणि गुण आपल्या जीवनात आत्मसात करण्याचे आवाहन केले. लालबहादूर शास्त्री यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष तसेच आयुष्यभर जपलेली प्रामाणिकता आणि सचोटी या गुणांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
जयंतीनिमित्त डॉ. अनिल नेरूरकर यांनी ‘नशामुक्त भारत’ या विषयावर व्याख्यान देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धी कदम हिने केले, तर मृणाली जेठे हिने आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

