Headlines

बांद्यातील बर्ड वॉकमध्ये ४० पक्ष्यांची नोंद

बेसरा आणि स्पेकल्ड पिक्युलेटची बांदा परिसरात प्रथमच नोंद

बांदा : ‘सह्याद्री ग्रीन फोर्स’, बांदा या समूहाच्या वतीने जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त बांदा येथील बळवंतनगर परिसरात बर्ड वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या बर्ड वॉकमध्ये एकूण १८ जणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी बांदा परिसरातील विविध अधिवासांमध्ये आढळणाऱ्या तब्बल ४० प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

या बर्ड वॉकदरम्यान बेसरा (Besra) आणि स्पेकल्ड पिक्युलेट (Speckled Piculet) या दोन पक्ष्यांची बांदा परिसरात प्रथमच नोंद करण्यात आली. याशिवाय कॉमन कुकू, मलबार इंपिरियल पिजन, ग्रीन वॉर्ब्लर, लोटर्न सनबर्ड, लिटल स्पायडरहंटर, व्हाइट-चीक्ड बार्बेट, इंडियन कुकूश्राइक, इंडियन स्किमिटर बॅबलर यांसह अनेक पक्ष्यांचे निरीक्षण सहभागीांना करता आले.

स्थानिक पातळीवर पक्ष्यांची नोंद करणे, पक्ष्यांची ओळख व त्यांच्याविषयीची माहिती एकमेकांशी शेअर करणे, परिसरातील जैवविविधतेबाबत जनजागृती करणे तसेच लहान मुलांमध्ये आणि नागरिकांमध्ये निसर्ग व पर्यावरणाविषयी आवड निर्माण करणे हा या बर्ड वॉकचा प्रमुख उद्देश होता.

या प्रसंगी प्रा. धिरेंद्र होळीकर सर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षी निरीक्षणाची सुरुवात कशी झाली आणि कालांतराने पक्षी निरीक्षणाची चळवळ कशी विस्तारत गेली, याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा. डॉ. गणेश मर्गज सर यांनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षीमित्रांनी एकत्र येऊन जिल्हास्तरावर पक्षी निरीक्षण आणि संवर्धनासाठी एक व्यापक कार्यक्रम आयोजित करावा, अशी इच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रवीण सातोसकर यांनी उपस्थित सर्व सहभागींचे आभार मानले.

उपस्थित

संजय नांदोसकर, निषाद नांदोसकर, अतूल बोंद्रे, गार्गी बोंद्रे, ओम बोंद्रे, प्रा. धिरेंद्र होळीकर सर, प्रा. डॉ. गणेश मर्गज सर, भाग्यश्री परब (मानद वन्यजीव रक्षक, सिंधुदुर्ग), रोहित परब, परब, प्रवीण सातोसकर, अधिराज आंबेरकर, सचिन प्रभू, सिद्धेश मुळये, संयोग प्रभू, नाना सावंत, श्लोक सावंत आणि भालचंद्र जोशी.

You cannot copy content of this page