‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ पुरस्कार वितरण सोहळ्यात महिलांच्या उद्योजकतेचा सन्मान

⚡कुडाळ ता.४-: महिलांनी केवळ रोजगार मागणाऱ्या न राहता रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजिका बनावे. प्रत्येक महिलेच्या अंगी प्रचंड ऊर्जा आणि क्षमता आहे. या ऊर्जेचा योग्य उपयोग करण्यासाठी महिलांनी स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे. सामाजिक कार्यापासून सेवेकडे आणि कर्मापासून कर्मयोगाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे प्रवर्तक, जागृत नाशिक भारत अभियानाचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद यांनी केले.
नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ पुरस्कार वितरण सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ नवउद्योजिका महिलांना सन्मानित करण्यात आले. सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संजीवन उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी सातपूर बसस्थानकाजवळील रेशीमगाठी लॉन्स येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात आरोग्य विभागांतर्गत फिरत्या दवाखान्याचे लोकार्पणही करण्यात आले.
या सोहळ्याला स्वामी श्रीकंठानंद, त्र्यंबकेश्वर येथील महंत शंकरानंद सरस्वती, महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी, सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या संस्थापक अध्यक्ष तथा कल्याणी संस्थेच्या राज्याध्यक्ष डॉ. सुनीता मोडक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संतोष मंडले, आश्रय प्रतिष्ठान कुडाळचे संस्थापक अध्यक्ष माधव गोरे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त अॅड. भाऊसाहेब गंभीरे, अनामिका मोताळे, शिवणकाम केंद्राच्या महिला उद्योजिका उन्मेषा दाभोलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्वामी श्रीकंठानंद यांनी समाजातील प्रश्नांचा केवळ वरवर विचार न करता त्यांच्या मुळाशी जाण्याचे आवाहन केले. भारतभूमीत जन्माला येणे हे भाग्य असून प्रत्येकाने भारत समजून घेत आपले जीवन अधिक समृद्ध करावे, असे ते म्हणाले. कला आणि मनोरंजन यांतील फरक स्पष्ट करताना कला जीवनाचा उत्कर्ष घडवते, तर केवळ मनोरंजन जीवनाला अधोगतीकडे नेऊ शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. सुनीता मोडक यांनी महिलांनी रोजगारासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतः रोजगार निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्योजिका बनविणे, हा संजीवन उद्योग समूहाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील हजारो महिलांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
उन्मेषा दाभोलकर यांनी छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि आर्थिक स्वावलंबन साधण्याच्या उपक्रमाची माहिती दिली. महाराष्ट्रातील शिवणकाम रोजगार मोहिमेचा प्रारंभ सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे डॉ. सुनीता मोडक यांच्या उपस्थितीत झाला. राज्यात हा उपक्रम राबविणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा ठरल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
या सोहळ्यात सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, मुंबई, पुणे आदी जिल्ह्यांतील सुमारे ८० कर्तृत्ववान महिलांना ‘उद्योगिनी महाराष्ट्राची’ पुरस्काराने गौरविण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सिंधुदुर्गातील १४ नवउद्योजिकांचा विशेष गौरव
या राज्यस्तरीय सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ महिला उद्योजिका रेश्मा जळवी, उन्मेषा दाभोलकर, स्वाती पेडणेकर, मृणाल सावंत, कीर्ती पाटील, पूजा कुडव, सानिका सावंत, श्रुती केसरकर, स्वप्नाली जळवी, दर्शना धुरी, दर्शना मार्गी, प्रियांका सुकाळे, वृंदा राऊत आणि रोहिणी घाडी यांना ‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आश्रय प्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक माधव गोरे आणि सतीश पाथरुड यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.