Headlines

न्हावेलीत दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार;

भटाचेटेंब व चौकेकरवाडी बंधाऱ्यांवर फळ्या टाकून अडवले पाणी

​सावंतवाडी
वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावामध्ये दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करणे, पाण्याची साठवण करणे आणि भूजल पातळीत वाढ करणे या उद्देशाने ग्रामस्थांच्या लोकसहभागातून जलसंधारणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून गावातील ‘भटाचेटेंब बंधारा’ तसेच ‘चौकेकरवाडी आवळेभोम बंधारा’ या दोन्ही बंधाऱ्यांवर फळ्या टाकून पाणी अडवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
​या कामाच्या ठिकाणी
सावंतवाडी तालुक्याच्या सभापती सुश्मिता जाधव आणि गट विकास अधिकारी निलेश जाधव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या या जलजागृतीचे आणि श्रमदानाचे विशेष कौतुक केले. या पाहणी दरम्यान सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांच्यासह ग्रामपंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी न्हावेलीतील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य आणि सहभाग लाभला. पंचायत समिती सदस्य श्री. शरदजी धाऊसकर यांच्या थेट देखरेखीखाली दोन्ही बंधाऱ्यांवरील फळ्या बसवण्याचे आणि पाणी अडवण्याचे काम सुरळीत पार पडले.
​ऐन पावसाळ्यानंतर बंधाऱ्यांमध्ये पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांची (बोरवेल) भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत केलेल्या या ऐक्यामुळे आगामी उन्हाळ्यात न्हावेली गावाला भेडसावणारी संभाव्य पाणीटंचाई बऱ्याच अंशी दूर होईल, असा विश्वास स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page