Headlines

नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे…

विशाल परब यांच्या ‘पाणीदार’ उपक्रमाला मातोंड-तळेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡वेंगुर्ला ता.०४-: आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवसानिमित्त अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प केलेल्या परब यांच्या पुढाकारातून मातोंड-तळेवाडी येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आवाहनानुसार व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल परब यांनी वाढदिवसाचा उत्सव औपचारिक पद्धतीने न साजरा करता जलसंवर्धनाच्या कार्याला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजलपातळी टिकविणे आणि आगामी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये, या उद्देशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
मातोंड-तळेवाडी येथे ग्रामस्थांनी सकाळपासून श्रमदानातून बंधारा उभारला. या कामात महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणीसाठा वाढण्यास तसेच विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होणार असून, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
यावेळी विशाल परब यांनी ग्रामस्थांचे आभार मानत, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून सिंधुदुर्गात लोकसहभागाची नवी जलचळवळ उभी राहत असल्याचे सांगितले. मोठे कार्यक्रम न करता गावागावांत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहकार्याने जलसंधारणाची कामे करावीत, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले असून, त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“ही केवळ बंधारा उभारण्याची गोष्ट नसून गावागावांतून उभी राहणारी मोठी जलचळवळ आहे. एखाद्या बुकेऐवजी सिमेंटची गोणी स्वीकारली किंवा पोस्टर लावण्याऐवजी पाण्याचा साठा निर्माण केला, तर त्याचा फायदा भविष्यातील पिढ्यांना होईल. आजची गरज ओळखून जलसंवर्धनाकडे वळणे आवश्यक आहे,” असे विशाल परब यांनी सांगितले.
जिल्ह्यात विविध ठिकाणी अशाच प्रकारे वनराई बंधारे उभारण्याचे काम सुरू झाले असून, आगामी काळात या उपक्रमाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाला शेतकरी, महिला व ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी सरपंच मयुरी वडाचेपाटकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न ऊर्फ बाळू देसाई, नगरसेवक सचिन शेटये, ताता मेस्त्री, अनिल परब, माजी उपसरपंच आनंद परब, दत्ता धुरी, नंदकिशोर परब, विकास परब, बबीता कोंडूसकर, रवी मातोंडकर, आनंद मातोंडकर, महेश मातोंडकर, रूपक मातोंडकर, सत्यवान परब, प्रवीण गुरव, प्राची गुरव, प्रभावती घाडी, संता परब यांच्यासह महिला क्रांती ग्रामसंघ मातोंड, रवळनाथ शेतकरी गट आणि मातोंड गावठणवाडी शेतकरी गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page