⚡आंबोली ता.०३-: आंबोली विकास सोसायटीचे चेअरमन शशिकांत गावडे, पत्रकार विजय राऊत, सामाजिक कार्यकर्ते दीपक मेस्त्री व सुमित राऊत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आंबोली परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली.

आंबोलीतील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून हिरण्यकेशी नदीपात्रातील गाळ उपसा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आंबोली-हिरण्यकेशी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि आंबोलीतील कबुलायतदार जमिनींचा प्रश्न मार्गी लावावा, अशा विविध मागण्या पालकमंत्री राणे यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबोलीतील या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ते सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंबोलीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
