आमदार दीपक केसरकर यांनी पूर्ण केला दिलेला शब्द; ग्रामस्थांकडून सत्कार करून मानले आभार..
सावंतवाडी : ओटवणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी हायमास्ट बसविण्याचा दिलेला शब्द माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी पुर्ण केला आहे. आज श्री. केसरकर यांच्या हस्ते या सौर उर्जेवरील हायमास्टचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामस्थांकडून श्री. केसरकर यांचा सत्कार करत ऋण व्यक्त करण्यात आले.
ओटवणे देऊळवाडी सोमा भिवा गांवकर यांच्या दुकानाजवळ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील शासकीय जागेत सौर उर्जेवरील हायमास्ट बसविण्यात आला. स्थानिक आमदार विकास निधीतून ३ लाख ५० हजार रुपये यासाठी मंजूर करण्यात आले होते. छत्रपतींच्या पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी आमदार श्री.केसरकर यांनी ग्रामस्थांना हायमास्टबाबत शब्द दिला होता. त्यांना आपला शब्द पुर्ण केल्याने हा परिसर प्रकाशमान झाला आहे. त्यामुळे ओटवणे देऊळवाडीसह ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले आहेत.
याप्रसंगी आम. केसरकर म्हणाले, इथल्या युवकांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. हा परिसर प्रकाशमान व्हावा म्हणून हायमास्ट बसविण्यात आला असून तो सौरउर्जेवर चालणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला कोणताही आर्थिक भुर्दंड पडणार नसून युवकांनी गावात अस कार्य करत राहावं. ओटवणे हे सावंतवाडी संस्थानचे मूळ असून देव रवळनाथ इथलं दैवत आहे. त्यामुळे इथल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझा अधिक प्राधान्य राहणार आहे. गावच्या विकासासाठी जे करावं लागेल ते करण्यासाठी मी तत्पर असून नवीन रस्ता सुद्धा गावासाठी मंजूर करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात हा परिसर पर्यटनासाठी ओळखला जाणार असून त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असं मत व्यक्त केले.
यावेळी पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गांवकर, सरपंच आत्माराम गांवकर, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गांवकर, मनाली गांवकर, शिवसेना माजगाव विभाग प्रमुख उमेश गांवकर, मंगेश चिले, बाळकृष्ण भगत, बाबली गांवकर, चेतन गावकर, दिगंबर गांवकर, रामदास गांवकर, सुधीर गांवकर, संतोष गांवकर, न्हानू भानसे, विजय भानसे, सुनील मेस्त्री, बाबा गांवकर, जयसिंग गांवकर, मंगेश भिसे आदी उपस्थित होते.

