Headlines

राजाभाऊ स्वार यांच्या निधनाने जनसंपर्काचा ‘राजा’ हरपला…

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली…

⚡सावंतवाडी ता.०३-: माजी नगरसेवक तथा पाणीपुरवठा व आरोग्य खात्याचे माजी सभापती राजाभाऊ स्वार यांच्या अकाली निधनाने सावंतवाडी शहराने मनमिळावू, दिलदार आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणारा लोकाभिमुख कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या जाण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे, अशी भावना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली.

राजाभाऊ स्वार हे नगरसेवक म्हणून दोन वेळा निवडून आले होते. पाणीपुरवठा व आरोग्य खात्याचे सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. घराघरात असलेला त्यांचा संपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असलेली तळमळ यामुळे ते नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय होते. लोकांची कामे अत्यंत सचोटीने आणि आपलेपणाने करून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या समवेत त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यासोबतही त्यांनी काम केले. माजी नगराध्यक्ष सौ. पल्लवी केसरकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात राजाभाऊ स्वार यांनी सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली.
मनमिळावू स्वभाव, दिलदार व्यक्तिमत्त्व आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची त्यांची हातोटी यामुळे राजाभाऊ स्वार हे सर्वांच्या परिचयाचे आणि जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व बनले होते. आज असा ‘राजा’ आपण गमावला असून, त्यांच्या निधनाचे दुःख मनाला वेदना देणारे आहे.
“राजाभाऊंना श्रद्धांजली वाहताना मनाला वेदना होत आहेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ ईश्वर देवो,” अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी राजाभाऊ स्वार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

You cannot copy content of this page