Headlines

चिंदर येथील वनराई बंधारा; जलतारा खड्ड्यांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्या कडून प्रत्यक्ष पाहणी…

जलसंधारणाच्या कामातून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्याचे आवाहन; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांचे मार्गदर्शन..

⚡मालवण ता.०२-:
मालवण तालुक्यातील चिंदर देऊळवाडी येथील वहाळावर उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याची तसेच जलतारा खड्ड्यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड आणि गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व, पावसाचे पाणी अडविण्याची गरज तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शीतल पुंड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

देवबाग येथे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मॉक ड्रिलच्या निरीक्षणानंतर शीतल पुंड यांनी चिंदर येथे भेट देत जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, ग्रामस्थ तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड म्हणाल्या की, कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. त्यामुळे सध्या मुबलक पाणी उपलब्ध असले तरी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाचे पाणी अडविणे आणि ते जमिनीत मुरविणे अत्यंत आवश्यक आहे. यंदा सरासरी पर्जन्यमानात घट झाली असून मालवण तालुका जलसंधारणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने या कामांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

“आज परिसरात पाणी उपलब्ध आहे म्हणून भविष्यातही पाणीटंचाई भासणार नाही, असा समज करून घेऊ नका. पावसाचे पाणी एकदा वाहून गेले की एप्रिल-मे महिन्यात ते अडविणे शक्य होणार नाही. त्यामुळे परतीच्या पावसाचे पाणी आताच अडवून जमिनीत मुरविणे गरजेचे आहे,” असे शीतल पुंड यांनी स्पष्ट केले.

चिंदर देऊळवाडी येथील वनराई बंधाऱ्याची पाहणी करताना बंधाऱ्याच्या बांधकामाची पद्धत, पाण्याचा प्रवाह आणि पाणी साठवणुकीची क्षमता याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. केवळ काम पूर्ण करण्यासाठी काम न करता त्याचा प्रत्यक्ष जलसाठवणुकीसाठी उपयोग झाला पाहिजे. बंधाऱ्यातून पाणी खालून वाहून जाणार नाही, याची दक्षता घेऊन आवश्यक त्या तांत्रिक पद्धतीने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच अस्तित्वात असलेल्या पक्क्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आवश्यक असल्यास त्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून आवश्यक त्या दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्याबाबतही त्यांनी माहिती दिली.

यावेळी परिसरातील जलतारा खड्ड्यांचीही पाहणी करण्यात आली. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजलपातळी वाढविण्यासाठी अशा उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे शीतल पुंड यांनी सांगितले. उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करून उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनीही जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

चिंदर ग्रामपंचायतीने यापूर्वीही विविध उपक्रमांमध्ये चांगले काम केले असून जलसंधारणाच्या क्षेत्रातही ग्रामस्थांच्या सहभागातून प्रभावी काम उभे राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिसरातील सुमारे तीन किलोमीटरच्या भागात गाळ काढणे आणि इतर जलसंधारणाची कामे करण्यासाठी उपलब्ध निधीचा योग्य वापर करण्यासाठी प्रथम सविस्तर सर्वेक्षण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कोणत्या ठिकाणी बंधारा आवश्यक आहे, कुठे दुरुस्ती करणे गरजेचे आहे आणि कुठे गाळ काढल्यामुळे पाणी साठवणूक वाढू शकते, याचा अभ्यास करून कामांना प्राधान्य द्यावे, असे सांगण्यात आले.

जिल्हा परिषद स्तरावरील १५ टक्के निधीतून उपलब्ध असलेल्या निधीसोबतच आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही नियोजन करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी परागिणी पाटील, विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे, सूरज बांगर, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, केदार परुळेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, सागर अपराज, राजेंद्र प्रसाद गाड, संतोष राठोड, स्वाती जाधव, मिनाक्षी शिसाळ, उज्ज्वला पवार, नंदकुमार जुंधळे, प्रतीक्षा पालकर, हर्षद बेनाडे, सोनाली माळगांवकर, लक्ष्मी चिंदरकर, दुर्वा चिंदरकर, सुगंधा भाटकर, मनवा चिंदरकर, दीपा गोसावी, रोहिणी केळूसकर, वासंती मेस्त्री, विश्राम माळगांवकर, सिद्धेश नाटेकर, रणजित दत्तदास, दिगंबर जाधव, रोहित पाटील, समीर अपराज, दक्षता सुर्वे, अंजली गोसावी, श्रद्धा गोसावी, मानसी गोसावी, वैशाली गोसावी, चंद्रशेखर पालकर, संजय हडपी तसेच चिंदर नं. १ शाळेचे शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांनी मानले.

You cannot copy content of this page