बांदा/प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकोपयोगी आणि उत्कृष्ट उपक्रमांच्या माध्यमातून समाजात आशेचा किरण पसरवणाऱ्या ‘रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा’ या संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘आदर्श समाजसेवी संस्था’ अंतर्गत अत्यंत प्रतिष्ठेचा ‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा या क्लबला जाहीर झाला आहे. १ नोव्हेंबर रोजी मुंबई पनवेल येथे हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
४ वर्षांत ३५० हून अधिक उपक्रमांचा धडका
बांदा आणि परिसरातील तरुणांना एकत्र आणून गेल्या ४ वर्षांत क्लबने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच पर्यावरण संवर्धनासारख्या विविध क्षेत्रांत जवळपास ३५० हून अधिक यशस्वी उपक्रम राबवून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यात विशेष कौतुकाची बाब म्हणजे, एकट्या मागील वर्षभरातच १०० हून अधिक लोकाभिमुख उपक्रमांची धडाकेबाज अंमलबजावणी करण्यात आली, ज्याचा मोठा वाटा या पुरस्काराच्या निवडीत राहिला आहे.
आरोग्य शिबिरे, रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, क्रीडा व कला गुणांना वाव आणि आपत्कालीन मदतीसारख्या अनेक आघाड्यांवर तरुणांच्या या चमूने निस्वार्थ भावनेने कार्य केले आहे. तरुण रोट्रॅक्टर्सची हीच तळमळ, कल्पकता आणि सातत्य लक्षात घेऊन महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनने या सर्वोच्च सन्मानासाठी बांद्याच्या या युथ क्लबची निवड केली आहे.
हा पुरस्कार म्हणजे केवळ एका संस्थेचा बहुमान नसून क्लबच्या प्रत्येक सदस्याची मेहनत, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि बांदावासीयांनी वेळोवेळी पाठीशी उभे राहून दाखवलेला विश्वास यांचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर पुन्हा एकदा उज्ज्वल करणाऱ्या ‘रोट्रॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा’वर सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
येत्या १ नोव्हेंबर रोजी पनवेल येथे आयोजित भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार क्लबला प्रदान करण्यात येणार आहे.

