Headlines

बँकेने जप्त केलेले वाहन कमी किमतीत देण्याचे आमिष..

४.८० लाखांची फसवणूक:डोंबिवलीतून आरोपीला एलसीबीने ताब्यात घेतले;कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

⚡कणकवली ता.०२-: बँकेने जप्त केलेली वाहने कमी किमतीत मिळवून देतो, असे सांगून फिर्यादीची तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मागील काही काळापासून पोलिसांच्या हाती न लागलेला आरोपी अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या हाती लागला. मंगेश राघोजी बागवे (वय ५२, रा. सुदामवाडी, अर्जुन निवास, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व, जि. ठाणे; मूळ रा. मसुरे, देऊळवाडी, ता. मालवण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गु.र.नं. १७१/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) अंतर्गत ४ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश बागवे याने आपण बँकेतील अधिकारी असल्याचे फिर्यादीला सांगितले होते. तसेच बँकेने जप्त केलेली वाहने कमी किमतीत उपलब्ध करून देतो, असे आमिष दाखवून त्याने फिर्यादीकडून एकूण ४ लाख ८० हजार रुपये घेतले.

मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपीने फिर्यादीला वाहन उपलब्ध करून दिले नाही. तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगेश बागवे हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. मात्र, तो पोलिसांना मिळून येत नव्हता. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी आरोपीच्या पार्श्वभूमीबाबत माहिती घेत त्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून शोध सुरू ठेवला.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपी डोंबिवली, ठाणे परिसरात असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने डोंबिवली येथे जाऊन कारवाई करत १ ऑक्टोबर २०२६ रोजी मंगेश बागवे याला ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला कणकवली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार तसेच एलसीबी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत एलसीबी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई आणि अविनाश ओटवणेकर यांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page