पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश

मालवण दि प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील वराड तलावाची आमदार निलेश राणे यांनी पाहणी करून तलावाची सद्यस्थिती आणि पाणी साठवण क्षमतेचा आढावा घेतला. तलावात साचलेला गाळ उपसा करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन सविस्तर अहवाल तयार करावा, असे निर्देश त्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांना दिले.
तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता असली तरी गाळ साचल्याने तसेच काही ठिकाणी गळती व अन्य कारणांमुळे उपलब्ध क्षमतेचा पूर्ण वापर होत नसल्याचे पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे गाळ उपसा, आवश्यक दुरुस्ती आणि इतर तांत्रिक उपाययोजना करून तलावाची पाणी साठवण क्षमता प्रभावीपणे वाढविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार राणे यांनी प्रशासनाला दिल्या.
तालुक्यातील जलस्रोत अधिक सक्षम करून पाणी पातळी वाढविण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. उपलब्ध जलस्रोतांचा दीर्घकालीन व प्रभावी वापर होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांच्यासह पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
