गॅरी अन्ननसिएशन ; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त…

⚡मालवण ता.०१-:
मालवण शहरातील प्रमुख प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या देऊळवाडा परिसरासह पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या देवबाग परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या खराब रस्त्यांची येत्या दोन दिवसांत तातडीने दुरुस्ती न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःच्या पद्धतीने हा प्रश्न हाताळेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेचे तालुकाप्रमुख गॅरी अन्ननसिएशन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, देऊळवाडा परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांनी स्वतःहून रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला असता, “सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल” असे सांगून काम थांबवण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
मालवण हे महाराष्ट्रातील अग्रगण्य पर्यटनस्थळ आहे. मालवणमध्ये प्रवेश करताना देऊळवाडा परिसरातील खड्डेमय रस्ते पर्यटकांच्या थेट निदर्शनास येतात. त्यामुळे मालवणच्या पर्यटन प्रतिमेला मोठा धक्का बसत आहे. तसेच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देवबाग परिसरातील रस्त्यांवर केवळ खडी व पावडर टाकून सोडण्यात आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तात्पुरती डागडुजी न करता रस्त्यांचे योग्य आणि दर्जदार काम करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नागरिकांच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण ३० सप्टेंबर रोजी स्वतः सार्वजनिक बांधकाम कार्यालयात भेट देण्यासाठी गेले होतो. मात्र, संबंधित अधिकारी मुंबई येथे शासकीय कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर चर्चा करण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे.
सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीतील मालवण तालुक्यातील सर्व खराब रस्त्यांची त्वरित पाहणी करून दोन कार्यदिवसांच्या आत काम सुरू करावे. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे कोणताही गंभीर अपघात घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचीच राहील, असा स्पष्ट इशारा गॅरी अन्ननसिएशन यांनी दिला आहे.
