सावंतवाडी ता.०८-:
सावंतवाडी शहर व उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या स्वच्छता दूतांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर, शिधावाटप तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचा स्वच्छता दूत, कष्टकरी भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिला आणि दिव्यांग मुलांसह एकूण १४५ जणांनी लाभ घेतला.
यावेळी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर व त्यांच्या टीमने ९५ स्वच्छता दूतांची मोफत आरोग्य तपासणी केली. डॉ. सागावकर यांनी स्वखर्चाने आवश्यक इंजेक्शन व औषध-गोळ्यांचे वाटप केले. तसेच जनलोक मेडिकलचे मालक महेश परुळेकर यांनीही काही औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यांच्या या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. उमेश मसुरकर, निसर्गप्रेमी प्रसाद गावडे (रानमाणूस), डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तथा फिजिशियन डॉ. विशाल रेड्डी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने डॉ. उमेश मसुरकर, प्रसाद गावडे, डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक, डॉ. विशाल रेड्डी, साजिया पडवेकर, दीपक म्हापसेकर, विदिशा सावंत, द्रोपती राऊळ, मंगेश सावंत, महेश परुळेकर व रील स्टार जपा यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे म्हणाले, “सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची टीम २४ तास लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. निराधार व गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. यापुढेही अशाच प्रकारचे सेवाभावी उपक्रम सुरू ठेवण्यात येतील.”
संस्थेचे सल्लागार व उद्योजक शैलेशजी पै यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे, रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळणाऱ्या निराधार व्यक्तींना मदत करणे तसेच संकटाच्या काळात अहोरात्र धावून जाण्याचे कार्य संस्थेचे कार्यकर्ते निःस्वार्थपणे करत असल्याचे त्यांनी सांगितले. रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, समीरा खलील व हेलन निबरे हे संस्थेच्या सेवाकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“शहर स्वच्छ व सुंदर ठेवणारे हे स्वच्छता दूत आहेत म्हणून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. गरज भासल्यास स्वच्छता दूतांनी थेट संस्थेशी संपर्क साधावा. दरवर्षी अशाच प्रकारचा उपक्रम राबविला जाईल,” अशी ग्वाही पै यांनी दिली.
निसर्गप्रेमी प्रसाद गावडे यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. हर्ष सागावकर व डॉ. विशाल रेड्डी यांनी आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. उमेश मसुरकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, “गेल्या ३२ वर्षांपासून गोरगरीब रुग्णांची सेवा केली. आजच्या सन्मानामुळे त्या सेवेला जणू पावती मिळाल्यासारखे वाटत आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांमध्ये यापुढेही सहभागी राहीन,” असे सांगितले.
स्वच्छता दूतांचे युनियन लीडर बाबू बरागडे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. “आमच्यासाठी आजपर्यंत कोणी एवढे केले नाही. शैलेशजी पै व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य आमच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी असतात,” असे त्यांनी सांगितले.
साजिया पडवेकर यांनीही संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत महिलांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचा उल्लेख केला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांनी संस्थेच्या कार्याला कायम सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला प्रा. सुभाष गोवेकर, रूपाली पाटील, संजय पेडणेकर, समीरा खलील, अशोक पेडणेकर, सुजय सावंत, लक्ष्मण कदम, हेलन निबरे, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, शेखर सुभेदार यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी, नगरपरिषद स्वच्छता दूत व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
