उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे:युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्ञानविनिमय कार्यशाळा..
⚡सिंधुदुर्ग, ता.०७- : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध कृषी जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी लोकसहभागातून प्रभावी प्रयत्न करण्याची गरज असून, शेतकरी आणि स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून जैवविविधतेचे संवर्धन व व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी केले. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (यूएनडीपी सिंधुदुर्ग) सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुनीती सभागृहात दि.०७ सप्टेंबर रोजी आयोजित ज्ञानविनिमय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या, यूएनडीपी अंतर्गत विविध सामाजिक संस्थांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्कृष्ट कामे केली आहेत. जिल्हा जैवविविधतेने संपन्न असून जिल्ह्यातील पारंपरिक बियाणे, गौण वनोपज यांचे लोकसहभागातून संवर्धन व व्यवस्थापन होणे काळाची गरज आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक सहकार्य दिले जाईल असेही त्या म्हणाल्या.
कार्यशाळेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यूएनडीपी प्रतिनिधी ऊर्जस्वी सोंधी, टेरी प्रतिनिधी तन्वी शर्मा, टेरी प्रादेशिक समन्वयक आशा हडकऱ, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे, बायफ पुणे संस्थेचे प्रकल्प अधिकारी संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत मनोगत व्यक्त करताना यूएनडीपी प्रतिनिधी ऊर्जस्वी सोंधी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत करण्यात आलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच या पुढील काळातही प्रकल्प जिल्ह्यात सुरू राहून विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यूएनडीपीमार्फत एसजीपी ओपी-७ अंतर्गत गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या पाच प्रकल्पांचे कार्यशाळेत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये बायफ पुणे यांचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सचिन चोरगे, पृथ्वी संग्राम ग्रामविकास संस्थेचे दादासाहेब यादव, भागीरथ प्रतिष्ठानचे नितीन मालवणकर, प्रेरणा फाउंडेशनचे सचिन यादव, फ्यूचर ग्रीन संस्थेच्या श्रद्धा यांचा समावेश होता. यावेळी विविध शेतकरी गटांकडून कृषी उत्पादन साहित्य, कडधान्य, भाज्या, बियाणांचे स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यशाळेप्रसंगी शेतकऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून प्रकल्प राबविताना आलेले अनुभव कथन केले. प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू राहणारे विविध महत्त्वपूर्ण उपक्रम, शेतकरी, बचत गट तसेच शासनाच्या विविध स्तरावरील सहभागाबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी बायफ पुणे संस्थेचे प्रकल्प अधिकारी संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या बदलांची माहिती देत पुढील काळातही शासन स्तरावर सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले.
०००००
