⚡कुडाळ ता.०८-: तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते माणगाव रस्त्यावरील पुलाखाली आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलाखाली मृतदेह आढळून आल्यानंतर संबंधित पोलीस पाटील यांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुडाळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली.
आढळून आलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे, तसेच संबंधित व्यक्तीचा मृत्यू अपघातामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली.
दरम्यान, पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच परिसरातील बेपत्ता व्यक्तींबाबतची माहितीही तपासली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह…
