Headlines

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी सांगलीचे शिवराज काटकर

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी काटकर यांचे हार्दिक अभिनंदन केले.
पत्रकारांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन नूतन अध्यक्ष शिवराज काटकर यांनी दिले. महाराष्ट्रातील सुमारे ६०० पत्रकार व पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित होते.
पत्रकारांच्या व्यथा, समस्या आणि मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त यांनी यावेळी खंत व्यक्त केली. पत्रकारांची एकजूट कायम ठेवून सर्वसामान्य पत्रकारांच्या हितासाठी पत्रकार परिषद यापुढे अधिक सक्षमतेने कार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नूतन अध्यक्ष शिवराज काटकर यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांसोबतच प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांना घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. तसेच जिल्हास्तरावर ग्रामीण भागातील पत्रकारांच्या हितासाठी विशेष पावले उचलण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
मावळते अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेत नूतन अध्यक्षांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. विविध जिल्ह्यांतून आलेल्या पत्रकार व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा उत्साहात पार पडला.

फोटो
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी सांगलीचे जेष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक सोबत विश्वस्त एस एम देशमुख व अन्य

You cannot copy content of this page