उपसभापती गणेशप्रसाद गवस यांचा वनविभागाला इशारा; नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दोडामार्ग – प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रानटी हत्तींच्या उपद्रवाचा प्रश्न अद्याप कायम असून, वनविभागाकडून या समस्येवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यातच सध्या ‘ओमकार’ नावाचा हत्ती मुख्य कळपापासून लांब राहून गावागावांत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “ओमकार हत्तीसोबत खेळणे थांबवा आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस निर्णय घ्या,” अशी मागणी केली आहे. शिवाय वनविभाग हत्तीवर जे वेगवेगळे प्रयोग करते ते शेतकऱ्यांच्या मुळावर येत असून हे म्हणजे मांजराचा खेळ होतोय पण उंदराचा जीव जातोय असे याचा प्रत्यय येत असल्याचे गवस म्हणाले
गावागावांत ओमकारचे फिरणे चिंताजनक
रानटी हत्तींचा नैसर्गिक अधिवास हा जंगल परिसर असताना ओमकार हत्ती सातत्याने मानवी वस्त्यांच्या आसपास फिरत असल्याचे दिसून येत आहे. गावांमध्ये, शेतीच्या परिसरात किंवा मानवी वर्दळ असलेल्या ठिकाणी हत्तीचा वावर वाढणे ही बाब गंभीर असल्याचे गवस यांनी म्हटले आहे.
“गाव हा हत्तीचा नैसर्गिक अधिवास नाही. त्यामुळे ओमकार हत्तीचे गावागावांत फिरणे योग्य नाही. आज तो शांत दिसत असला तरी वन्यप्राणी शेवटी वन्यप्राणीच असतो. भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी वनविभागाने निर्णय घेणे गरजेचे आहे,” असे गवस यांनी स्पष्ट केले.
मुख्य कळपापासून दूर असलेला ओमकार धोकादायक ठरू शकतो
ओमकार हत्ती मुख्य कळपापासून लांब असल्याचे सांगितले जात असून, इतर हत्ती त्याला मुख्य कळपात स्वीकारत नसतील तर ही परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे उपसभापती गवस यांनी म्हटले आहे.
वन्य हत्तींच्या वर्तनाचा अभ्यास करून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, त्याचा अधिवास निश्चित करणे आणि मानवी वस्त्यांपासून त्याला दूर ठेवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“पकडू नये म्हणणाऱ्यांनी नुकसानाची जबाबदारी घ्यावी”
ओमकार हत्तीला पकडण्यास विरोध करणाऱ्या व्यक्तींवरही गवस यांनी निशाणा साधला आहे.
“ओमकारला पकडू नये, त्याला मोकळे सोडावे असे म्हणणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन नागरिकांच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी. वन्यप्राण्याबाबत भावनिक भूमिका घेणे वेगळे आणि नागरिकांच्या जीविताची जबाबदारी घेणे वेगळे आहे,” असे ते म्हणाले.
हत्तीमुळे एखाद्या नागरिकाच्या घराचे, शेतीचे किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान झाले किंवा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वनविभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हत्तींकडून शेतीचे नुकसान होणे, घरांच्या परिसरात वावर होणे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे या समस्या वारंवार समोर येत आहेत.
मात्र, या समस्येवर वनविभागाकडून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची भावना आहे. केवळ हत्ती गावात आल्यानंतर त्याला हुसकावून लावणे किंवा काही काळ त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे एवढ्यावर प्रश्न सुटणार नाही. हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय व्यवस्थापन, संवेदनशील गावांमध्ये पूर्वसूचना यंत्रणा, प्रभावी गस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी कृती आराखडा आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णयाची मागणी
ओमकार हत्तीच्या बाबतीत वनविभागाने केवळ परिस्थिती पाहत राहण्याऐवजी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घ्यावा. हत्तीला पकडणे, त्याचे स्थलांतर करणे किंवा त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात नेणे यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
“ओमकारच्या जीवाला धोका निर्माण करणे हा उद्देश नाही; मात्र नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ नये. वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे वनविभागाने आता ठोस भूमिका घेतली पाहिजे,” असे गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले.
फोटो – गणेशप्रसाद गवस आणि ओमकार हत्ती
