Headlines

कणकवली तालुक्यात प्रारूप मतदार यादी जाहीर; १३ हजार १६ मतदार वगळले

तालुक्यात आता ९५ हजार ८५३ मतदार; ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

कणकवली : तालुक्यातील प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण ९५ हजार ८५३ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४७ हजार ९९६ पुरुष मतदार आणि ४७हजार ८५७ महिला मतदारांचा समावेश आहे.

तालुक्यात एकूण १३८ मतदान केंद्रे आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये कणकवली तालुक्यातील पूर्वीच्या १ लाख ८ हजार ८६९ मतदारांपैकी १३ हजार १६ मतदार वगळण्यात आले असून, प्रारुप मतदार यादीतील मतदारांची संख्या आता ९५ हजार ८५३ इतकी झाली आहे.

वगळण्यात आलेल्या नोंदींमध्ये ५६१३ मृत मतदार, ५ हजार ९९६ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, ७९७दुबार नोंदी तसेच ६१० शोधूनही न सापडलेले किंवा इतर कारणांमुळे अपात्र मतदारांच्या नोंदींचा समावेश असल्याची माहिती कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 2026 प्रारुप मतदार यादी दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आपले नाव मतदारयादीत अचूक असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन तहसिलदार कणकवली तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे. प्रारुप मतदार यादीतील नाव निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर तसेच आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना पडताळता येईल. सदरची प्रारूप मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बुथ लेव्हल एजंट यांचेकडे मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच मतदारयादीची एक प्रत तहसील कार्यालय, कणकवली व उपविभागीय अधिकारी कार्यालय, कणकवली येथे देखील पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे, असे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी सांगितले.

३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती

बऱ्याच नागरिकांना मतदार यादीतील आपल्या नावाबाबत किंवा नोंदींबाबत शंका असू शकतात. मतदारांनी प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव, पत्ता तसेच इतर तपशील तपासून घ्यावेत. नावाचा समावेश करणे, चुकीची नोंद दुरुस्त करणे अथवा मतदार यादीतील इतर नोंदींबाबत हरकत असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती सादर करता येतील. प्राप्त दावे व हरकतींवर नियमानुसार सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक असल्यास विहित नमुन्यात अर्ज करावेत. नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म ६, नाव वगळण्यासाठी अथवा हरकतींसाठी संबंधित विहित नमुने वापरता येतील. नागरिकांना मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी वोटर हेल्पलाईन अॅप तसेच ई-सीनेट या माध्यमांचाही उपयोग करता येणार आहे. अन् मॅप असणाऱ्या काही मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीत समाविष्ट झालेली आहेत. त्यांची सुनावणी तहसील कार्यालय कणकवली येथे घेतली जाणार आहे. त्याबाबत संबंधित मतदारांना नोटीस देऊन सूचना दिली जाणार आहे. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार कणकवली तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page