शेतकऱ्याला तीन लाखांची मदत देण्याची मागणी:तुटपुंजी मदत दिल्यास महावितरणच्या कुडाळ कार्यालयावर शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा..
⚡कुडाळ ता.०१-: हीर्लोक-भटवाडी येथे वीजवाहिनी तुटून अंगावर पडल्याने शेतकरी गणेश शिवराम परब यांची गाभण गाय आणि दुभती म्हैस अशी दोन जनावरे जागीच दगावली. या घटनेमुळे शेतकरी परब यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना किमान तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी हीर्लोकच्या सरपंच सौ. प्राची सावंत आणि उपसरपंच नरेंद्र राणे यांनी केली आहे.
हीर्लोक-भटवाडी येथील शेतकरी गणेश परब यांची गाय व म्हैस जवळच्या शेतात चाऱ्यासाठी बांधण्यात आली होती. त्यावेळी अचानक वीजवाहिनी तुटून दोन्ही जनावरांच्या अंगावर पडली. विजेचा धक्का लागल्याने दोन्ही जनावरे जागीच दगावली. या घटनेमुळे गरीब शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येणारे जनावरांचे मूल्यांकन तुटपुंजे असल्यास शेतकऱ्यावर अन्याय होईल. त्यामुळे महावितरणने दोन्ही जनावरांच्या नुकसानीपोटी किमान तीन लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी सरपंच प्राची सावंत यांनी केली.
“शेतकऱ्याला तुटपुंजी मदत देऊन त्याची कुचेष्टा करू नये. योग्य नुकसानभरपाई मिळाली नाही, तर ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरणच्या कुडाळ येथील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा उपसरपंच नरेंद्र राणे यांनी दिला.
घटनेचा पंचनामा करताना पोलीस पाटील दीपक कदम, हीर्लोक तलाठी संतोष बांदेकर, महावितरणचे अधिकारी श्री. पाटील तसेच ओरोस येथील वीज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
