⚡मालवण ता.०१-:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘सृजन संघटन’ या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या नूतन जिल्हाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले अरविंद मोंडकर यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महात्मा फुले यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘सृजन संघटन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून निवड झालेल्या नूतन जिल्हाध्यक्षांसाठी नाशिक येथे दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होऊन नूतन जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यांतून निवड झालेले नूतन जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. सत्कारानंतर अरविंद मोंडकर यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
