Headlines

संतांच्या सानिध्यातच खरा आनंद…

गुरुमाऊली शोभाताई:संसार न सोडता परमार्थाचा मार्ग अवलंबा..

⚡सावंतवाडी ता.०१-: संतांच्या सानिध्यात खरा आनंद आहे. थोर संत, महंतांनी देखील हा उपदेश आपल्याला दिला असून समर्थ रामदासांनी दासबोधातून भक्तीमार्ग विषद केला आहे. तर संसार, प्रपंचाचा त्याग न करता योग्य विचार व परमार्थाचा मार्ग काडसिध्देश्वर स्वामी महाराजांनी दाखवला आहे. त्याचे पालन करावे, असा उपदेश काडसिध्देश्वर महाराजांच्या शिष्या गुरुमाऊली शोभाताई यांनी केला. श्रावण सप्ताह सांगता व दासबोध वाचन समाप्ती कार्यक्रमात त्यांनी भक्तांना संबोधित केले.

सावंतवाडीतील काडसिद्धेश्वर भवन इथे प.पू. श्री. काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या मठात मंगळवारी श्रावण सप्ताह सांगता व दासबोध वाचन समाप्ती सोहळा संपन्न झाला. श्रावण मासाच्या सुरूवातीपासून या सप्ताहास सुरुवात झाली होती. काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या गुरुमाऊली शोभाताईंच्या प्रमुख उपस्थितीत काकड आरती, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न झाला. शेकडो भक्तांनी यावेळी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला

यावेळी प्रवचनातून शोभाताई यांनी भक्तांना उपदेश केला. त्या म्हणाल्या, ‘दासबोध’ म्हणजे दासांसाठी समर्थांनी केलेला बोध आहे. गुरू-शिष्यांचा संवाद यात असून समर्थांनी यातून भक्तीमार्ग स्पष्ट केला आहे. ९ भक्तीमार्ग रामदास स्वामींनी या ग्रंथातून सांगितलेत.‌ तर संतांकडे आनंद लहरी असून त्यांच्या सानिध्यात खरा आनंद मिळतो. सदा संतांपाशी जावे अशी रचना प.पू. श्री वासुदेवानंद टेंब्ये स्वामींनी केली असून सतत संतांपाशी जाण्याचा, त्यांच्या सहवासात राहण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. सत्संगात निजबोधाची प्राप्ती होत असून संत आनंदाचे स्थळ आहेत. शिष्याच्या अंगी तो आनंद घेण्याची तत्परता असली पाहिजे. गुरु शिष्यांना योग्य मार्ग दाखवतो. त्यामुळे ब्रम्हज्ञान गुरुकडून समजून घेतलं पाहिजे. काडसिद्धेवर महाराजांनी उपासतापास करण्यास सांगितले नसून संसार त्याग न करता, प्रपंच न सोडता योग्य विचार, परमार्थाचा व संतवचनाचे पालन करण्याचा संदेश दिल्याचा उपदेश त्यांनी केला. तसेच ज्याचा सखा हरी त्याच्यावर सर्व विश्व प्रेम करत. जनाबाई, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ महाराजांनी देवाला आठवलं. विठ्ठल भक्तीचा मार्ग त्यांनी दाखवला, आज लाखो भक्त दरवर्षी पायी वारी करत तिथे जातात असेही गुरुमाऊलींनी सांगितले.

You cannot copy content of this page