रस्ते, विसर्जन स्थळे, पार्किंग व स्वच्छतेबाबत प्रशासनाची तयारी
मालवण (प्रतिनिधी)
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात भाविकांना आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय भासू नये, यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने विविध सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोजित नियोजन बैठकीत शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, विसर्जन स्थळांची व्यवस्था, पार्किंग नियोजन आणि अग्निशामक दलाची तत्परता यांसारख्या विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले.
गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषदेच्या सभागृहात आज विशेष नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस नगराध्यक्षा ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, नायब तहसीलदार नीलिमा प्रभुदेसाई, नगरसेविका नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, मंदार केणी, महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, ललित चव्हाण, व्यापारी नितीन वाळके, नितीन तायशेटे, बाळू अंधारी, संदेश कोयंडे आदी तसेच याशिवाय एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे आणि नगरपरिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
मालवण शहरातील खराब रस्त्यांवरून नागरिक आणि वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात घेता, नगरसेवकांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न तीव्रतेने मांडत गणेशोत्सवात गणेशभक्तांना खड्डेमय रस्त्यांचा त्रास होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील खड्डे बुजविण्याची कार्यवाही उद्या बुधवार रात्रीपासून प्रत्यक्षपणे सुरू केली जाईल असे सांगत गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले.
शहरात कुठेही नगरपालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात येणाऱ्या बॅनर्स आणि पोस्टर्सचा प्रश्नही गाजला. यावर मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी कडक भूमिका घेत “जर अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांचा पत्ता लागला नाही, तर ते बॅनर ज्या प्रिंटींग व्यवसायातून छापले गेले आहेत, त्या प्रिंटींग प्रेस मालकांवरच कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणीही परवानगी घेतल्या शिवाय बॅनर लावू नये, तसेच जी जागा नेमून दिली जाईल तेथेच बॅनर लावावा, असे स्पष्ट केले.
शहरातील अनेक भागांमध्ये विद्युत तारा आणि वाहिन्या धोकादायक अवस्थेत आहेत, ज्यामुळे उत्सवाच्या काळात अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धोकादायक वीज वाहिन्यांचा सर्व्हे करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती दुरुस्ती तत्काळ करावी, असे निर्देश नगराध्यक्ष सौ. वराडकर यांनी दिले.
गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, मुख्य बाजारपेठेतील फळविक्रेत्यांना उत्सवाच्या दिवसांमध्ये अन्यत्र बसविण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवरही बैठकीत चर्चा झाली. यावर मुख्याधिकारी श्री. थोरात यांनी सध्या गणेशोत्सवाचे नियोजन सुरू असल्याने, मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची विशेष मोहीम गणेश चतुर्थी सण आटोपल्यानंतर राबविली जाईल, असे स्पष्ट केले.
शहरातील बहुतांश रस्त्यांचे एप्रिल व मे महिन्यात डांबरीकरण करण्यात आले होते. उर्वरित रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी तसेच काही रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सध्या प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी व गवत कापण्यासाठी नगरपरिषद आरोग्य विभागामार्फत ५ ऑगस्ट पासून कारवाई सुरू करण्यात आली असून १२ सप्टेंबर पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, शहरात डास प्रतिबंधक फवारणी जून महिन्यापासून अखंडपणे सुरू आहे, असे प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात शहरात अंधार राहू नये यासाठी हायमास्ट आणि स्ट्रीट लाईट्सच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. नगरपरिषदेने यासाठी वार्षिक ठेकेदार नियुक्त केला असून वीज वितरण कंपनीशी समन्वय साधून अखंडित वीज पुरवठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शहरात एकूण २२ गणेश विसर्जन स्थळे असून, तिथे दीड दिवसापासून ते १० दिवसांच्या विसर्जनापर्यंत हॅलोजन लाईट व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चिवला बीच, बंदर जेटी आणि दांडी बीच या ठिकाणी समुद्र किनारी जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मूर्ती विसर्जन केले जाईल. विसर्जन स्थळांवर गाळ काढणे व पायऱ्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच समुद्र परिसर व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले असून नागरिकांनी निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणतीही आपत्कालीन घटना किंवा आगीची दुर्घटना घडल्यास नगरपरिषदेचे अद्ययावत अग्निशमन वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे.
उत्सव काळात शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १३ ते २५ सप्टेंबर दरम्यान पार्किंग व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. यात सागरी महामार्ग खासगी बस/ट्रक/अवजड वाहने थांबवणे व पार्किंग, नाट्यगृह आवार खासगी वाहने पार्क करणे, बांगीवाडा सहा आसनी रिक्षा/टेंपो/कार पार्किंग, सारस्वत बँक एका बाजूला फक्त मोटार सायकल पार्किंग, मशीद गल्ली फक्त सायकल पार्किंग, जेटी परिसर सारस्वत बँकेकडील अतिरिक्त रिक्षांकरिता पार्किंग, सुबोध मेडिकल ते भाजी मार्केट रस्ता तीन आसनी रिक्षा व हातगाड्यांसाठी, राणे मेडिकल सर्व वाहनांना प्रवेश बंद, हॉटेल सागर किनारा रस्ता एका बाजूला रिक्षा थांबा, सारस्वत बँक रिक्षा थांबा, बॉम्बे टेक्स्टाईल्स उजवीकडे फक्त सायकलसाठी प्रवेश, रिक्षा/चारचाकी वाहनांना प्रवेश बंद, नेरूरकर गल्ली सर्व वाहनांसाठी बंद, धक्का जेटी सर्व वाहनांसाठी वाहनतळ, भरड नाका ते स्टेट बँक सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग बंदी, गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सातव्या दिवशी, अकराव्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर सोमवार पेठ रस्त्याने वाहने आणि एस.टी. बसेसचा प्रवेश पूर्णपणे बंद राहील. तसेच, १३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत भरड येथील पार्किंग नागरिकांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात शहरातील सर्व नागरिक, व्यापारी आणि रिक्षा व्यावसायिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करून उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.
