Headlines

गणेशोत्सवापूर्वी सावंतवाडी मतदारसंघाला १५ नव्या एसटी बस…

आम. दीपक केसरकर: सावंतवाडी बसस्थानकाच्या आराखड्यात बदलांच्या सूचना; तिन्ही आगारांसाठी मिनीबस देण्यास तत्त्वतः मंजुरी..

⚡सावंतवाडी, ता.०१-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एसटी महामंडळाच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत आज मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आयोजित या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यांतील एसटी सेवेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाला मंजूर असलेल्या ३० बसपैकी १५ नवीन बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सावंतवाडी एसटी बसस्थानकाच्या प्रस्तावित आराखड्याचे सादरीकरण परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत केले. या आराखड्यात आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना आमदार केसरकर यांनी केल्या. त्यानुसार पुढील चार दिवसांत सुधारित आराखडा पुन्हा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी ३० बसेस मंजूर असून त्यापैकी पाच बसेस सावंतवाडी आगाराला प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित बसेसपैकी १५ बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार केसरकर यांनी केली. त्यानुसार सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यांना प्रत्येकी पाच बसेस देण्याचे निर्देश देण्यात आले.
मतदारसंघातील अनेक गावे दुर्गम व डोंगराळ भागात असून काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. गावांच्या अंतिम ठिकाणी बस वळविण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने एसटी बससेवा चालविताना अडचणी येतात. तसेच कमी भारमानामुळे काही बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही आगारांसाठी मिनीबस उपलब्ध करून दिल्यास दुर्गम भागातील वाहतूक समस्या दूर होण्यासोबतच एसटीचे भारमान वाढण्यास मदत होईल, अशी भूमिका आमदार केसरकर यांनी मांडली. त्यांची मागणी तत्त्वतः मान्य करून लवकरात लवकर मिनीबस उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
वेंगुर्ले आगारातील सीएनजी बसेसना सुमारे चार किलोमीटर अंतरावरील खासगी सीएनजी पंपावर जावे लागते. वाहतूक कोंडीमुळे सीएनजी भरून परत येण्यासाठी मोठा वेळ लागतो. तसेच ये-जा करण्यासाठी बसला सुमारे आठ किलोमीटर अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, इंधन आणि मनुष्यबळाचा अपव्यय होत आहे. वेंगुर्ले एसटी आगारात एमएनजीएलमार्फत मंजूर असलेले सीएनजी युनिट अद्याप सुरू झालेले नसल्याने ते काम तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार केसरकर यांनी केली. यावर मंजूर सीएनजी युनिटचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिले.
वेंगुर्ले ते बोरिवली बंद असलेली एसटी बसफेरी पूर्ववत सुरू करण्याची मागणीही आमदार केसरकर यांनी केली. याबाबत तातडीने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, एसटी महामंडळातील काही कर्मचारी आरटीओ विभागाकडे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याने एसटीच्या नियमित सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. महामंडळाकडे आधीच अपुरा कर्मचारी वर्ग असताना प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटी महामंडळाच्या सेवेत आणण्याची मागणी करण्यात आली. आरटीओ विभागात लवकरच भरती होणार असून त्यानंतर एसटी महामंडळाचे प्रतिनियुक्तीवरील कर्मचारी पुन्हा त्यांच्या मूळ सेवेत कार्यरत होतील, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
बैठकीला राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (बांधकाम) दिनेश महाजन, मुंबई प्रदेशाचे कार्यकारी अभियंता (बांधकाम), सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक घोडे, आर्किटेक्ट हुजेफर भोल, सूरज शेट्टी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

You cannot copy content of this page