ओटीपी मागून नागरिकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढले; नागरिकांनी सतर्क राहण्याचे सावंतवाडी पोलिसांचे आवाहन..

⚡सावंतवाडी ता. ३१-: शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून एमजीएल घरगुती गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांना एसएमएस तसेच फोन कॉल करून फसवणुकीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. संबंधितांकडून नागरिकांना ओटीपी मागण्यात येत असून, अशा प्रकारे सावंतवाडी शहरातील दोन ते तीन नागरिकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात लेखी निवेदन सादर केले. एमजीएल घरगुती गॅस कनेक्शनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सेवा कार्यान्वित झालेली नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांनी नागरिकांना अनोळखी एसएमएस किंवा फोन कॉलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. गॅस कनेक्शन सुरू करणे, बंद करणे अथवा अन्य सुविधा देण्याच्या नावाखाली कोणी ओटीपी किंवा पैशांची मागणी केल्यास प्रतिसाद देऊ नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, बँक खाते, एटीएम कार्ड अथवा अन्य गोपनीय माहिती देऊ नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच अनोळखी ॲप डाउनलोड करू नये. गॅस कनेक्शनबाबत माहिती आवश्यक असल्यास संबंधित विभागाच्या स्थानिक कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून अधिकृत माहितीची खात्री करावी, असेही पोलिसांनी सांगितले. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी विलंब न करता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.”
