कणकवली रेल्वे स्थानकादरम्यान प्रकार उघड; सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल, रोकड व महत्त्वाची कागदपत्रे लंपास..

⚡कणकवली ता.३१-: उडपी येथून मुंबईला गरीबरथ एक्सप्रेसने प्रवास करत असताना झोपलेल्या महिलेच्या हँडबॅगवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या बॅगेमध्ये सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण १ लाख ७६ हजार ८५० रुपयांचा ऐवज होता. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे कणकवली रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार महिलेच्या लक्षात आला.
याप्रकरणी श्रीदेवी पी. एम. (वय ४०, रा. गोरेगाव, मुंबई) यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीदेवी पी. एम. या २२ ऑक्टोबर रोजी पती विजय अय्यर यांच्यासोबत देवदर्शनासाठी उडपी येथे गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून मुंबईला परतण्यासाठी त्यांनी गरीबरथ एक्सप्रेसच्या जी-७ डब्यातील सात व आठ क्रमांकाच्या आसनांचे आरक्षण केले होते. २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास उडपी रेल्वे स्थानकातून त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासादरम्यान त्यांनी आपली हँडबॅग पायाजवळ ठेवली होती. त्यानंतर त्यांना झोप लागली.
२६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गाडी कणकवली रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांना जाग आली. त्यावेळी पायाजवळ ठेवलेली हँडबॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पतीसह संपूर्ण डब्यात बॅगेचा शोध घेतला; मात्र बॅग मिळून आली नाही.
चोरीस गेलेल्या बॅगेमध्ये सहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या होत्या. त्यापैकी एका अंगठीत ओव्हल आकाराचा, तर दुसऱ्या अंगठीत गोल आकाराचा हिरा होता. याशिवाय रेडमी कंपनीचा मोबाईल, १ हजार ५०० रुपये रोख, श्रीकृष्णाची मूर्ती, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आणि एसबीआयचे एटीएम कार्ड असा ऐवज होता.
झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हँडबॅग चोरून नेल्याचा संशय श्रीदेवी पी. एम. यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुफल करीत आहेत.
