⚡मालवण ता.३१-:
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री देव रामेश्वर मंदिरातून होणार आहे. तेथून श्री देव नारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई व श्री देवी सातेरी या सर्व देवतांना सांगणे करून पालखी आडवण मार्गे तानाजी नाका वायरी येथे पोहोचेल. त्यानंतर श्री देव भूतनाथ मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर पालखी समुद्रमार्गे मोरयाचा धोंडा येथे जाईल.
पुढे दांडेश्वर मंदिर येथून श्री काळबादेवी मंदिर येथे पालखी पोहोचेल. तेथून जोशी मांड येथे जाऊन त्यानंतर मालवण नगर वाचनालयाकडून सोमवार पेठेतील श्री देव रामेश्वर मांड येथे भाविकांच्या दर्शनासाठी पालखी परतणार आहे. यानंतर प्रतिवर्षीप्रमाणे बाजारपेठेच्या भरड मार्गे देऊळवाडा येथे श्री देव रामेश्वर मंदिरात पालखी सोहळयाची सांगता होणार आहे.
मालवणच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या वार्षिक पालखी सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, सातेरी व इतर देवस्थान ट्रस्ट मालवण च्या वतीने करण्यात आले आहे.
