Headlines

नांदगाव स्टेशनवर विसरलेली पाच हजारांची रोकड असलेली बॅग सुखरूप परत…

माजी सरपंच तुकाराम गुरव यांच्या सतर्कतेमुळे महिलेला मिळाले हरवलेले साहित्य:पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांची तत्परता..

⚡कणकवली ता.३१-: रेल्वे प्रवासादरम्यान स्थानकाचा अंदाज न आल्याने झालेल्या गडबडीत नांदगाव रेल्वे स्थानक परिसरात पाच हजार रुपये रोख रक्कम आणि अन्य साहित्य असलेली बॅग विसरून राहिली. मात्र, वाघेरीचे माजी सरपंच तथा विकास सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष तुकाराम गुरव यांच्या सतर्कतेमुळे ही बॅग संबंधित महिला प्रवाशाला सुखरूप परत मिळाली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे.

नांदगाव मोरयेवाडी येथील सौ. संतोषी संतोष मोरये या रेल्वेने प्रवास करत होत्या. नांदगाव स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर त्या आपल्या लहान मुलासह खाली उतरण्याच्या तयारीत होत्या. यावेळी मुलगा खाली उतरला आणि बॅगही स्थानकावर ठेवण्यात आली. मात्र, रेल्वे पुन्हा सुरू झाल्याने झालेल्या धावपळीत मुलाला सुखरूप आईच्या स्वाधीन करण्यात आले; परंतु पाच हजार रुपये रोख रक्कम आणि अन्य साहित्य असलेली बॅग स्थानक परिसरातच राहून गेली.

दरम्यान, याच रेल्वेतून वाघेरीचे माजी सरपंच तुकाराम गुरव हेही उतरले होते. त्यांच्या निदर्शनास ही बॅग आली. मात्र, बॅग नेमकी कोणाची आहे आणि संबंधित महिला कोणत्या गावातील आहे, याची त्यांना माहिती नव्हती. संबंधित महिला नांदगाव, तोंडवली किंवा बावशी परिसरातील असावी, असा अंदाज बांधून त्यांनी आपल्या परिचितांमार्फत बॅगमालक महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली.

याचदरम्यान एका नागरिकाने नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्याशी संपर्क साधून रेल्वेतून उतरताना मोरये नावाच्या महिलेची बॅग राहिली असल्याची चौकशी केली. त्यावर पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत नांदगाव मोरयेवाडी येथील संतोषी संतोष मोरये यांचीच बॅग असल्याचे स्पष्ट केले. संबंधित महिलेने यापूर्वीच बॅग हरवल्याची माहिती त्यांना दिली होती.

यानंतर पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी संतोषी मोरये यांना सोबत घेत वाघेरी येथे जाऊन बॅग ताब्यात दिली. बॅग तपासली असता त्यामध्ये असलेली पाच हजार रुपयांची रोख रक्कम आणि अन्य सर्व साहित्य सुरक्षित असल्याचे आढळून आले.

अल्पावधीतच हरवलेली बॅग आणि त्यातील सर्व साहित्य सुखरूप परत मिळाल्याने संतोषी मोरये यांनी तुकाराम गुरव, पोलीस पाटील वृषाली मोरजकर तसेच मदतीसाठी पुढाकार घेतलेल्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

यावेळी वाघेरीचे माजी सरपंच तथा विकास सोसायटीचे उपाध्यक्ष तुकाराम गुरव, लिंगेश्वर-वाघेरीचे पोलीस पाटील अजिंक्य गुरव आणि नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर उपस्थित होते. रेल्वे प्रवासातील धावपळीत हरवलेली बॅग प्रामाणिकपणा, सतर्कता आणि परस्पर सहकार्यामुळे पुन्हा मिळाल्याने या घटनेचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page