Headlines

काजू नुकसानभरपाईपासून तांबोळीतील शेतकरी वंचित

गणेश चतुर्थीपर्यंत रक्कम न मिळाल्यास कृषी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा

बांदा/सकाळ वृत्तसेवा
तांबोळी गावातील अनेक शेतकऱ्यांना काजू पिकाच्या नुकसानीपोटी मंजूर झालेली नुकसानभरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गणेश चतुर्थीपर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी कार्यालयावर धडक देण्याचा इशारा तांबोळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद देसाई यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, वादळी वारे तसेच विविध नैसर्गिक आपत्तींचा काजू उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे काजू बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र तांबोळीतील काही शेतकऱ्यांना अद्याप या मदतीपासून वंचित राहावे लागले आहे.
नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यासाठी शेतकरी संबंधित कार्यालयांकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना नुकसानभरपाई रखडणे योग्य नाही. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ अदा करावी, अशी मागणी मिलिंद देसाई यांनी केली आहे.
गणेश चतुर्थीपर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास तांबोळीतील शेतकऱ्यांना एकत्र करून कृषी कार्यालयावर जाऊन जाब विचारण्यात येईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे.
फोटो:-
मिलिंद देसाई.

You cannot copy content of this page