⚡सिंधुदुर्गनगरी ता १-:
ग्रामसभा ही ग्रामीण लोकशाहीची महत्त्वपूर्ण व्यवस्था असली तरी ग्रामसभा आयोजित करताना ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्माण होणाऱ्या असुरक्षितेच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद मुख्य इमारत ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला.
या मूक मोर्चात मोठ्या संख्येने जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी प्रदीप नारकर, वैभव ठाकूर, उमेश खोबरेकर, यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे अध्यक्ष प्रशांत वर्दम यांनी आपले विचार मांडताना ग्रामसभेदरम्यान उद्भवणाऱ्या विविध घटना आणि समस्या याबाबत मार्गदर्शन केले तर ग्रामसभेचे सचिव पद सांभाळताना अनेक अडचणींचा व प्रसंगांचा सामना करावा लागतो. अशावेळी सचिव एकटा असतो त्याला साथ देणारे आणि संरक्षण देणारा कोणी नसतो, त्यामुळे गावातील गटातटाच्या राजकारणात ग्रामविकास अधिकाऱ्याचा बळी जातो, ही बाब गंभीर आहे तसेच शासनाकडून परिपत्रक काढून अनेक ग्रामसभांचे आयोजन करण्याबाबत सुचविले जाते. मात्र अशा सभांमध्ये केवळ विकास कामावरील चर्चेपेक्षा वादच अधिक होतात. त्यामुळे शासनाने ग्रामसभांची संख्या कमी करावी तसेच ग्रामसभांना संरक्षण देण्याची तरतूद करावी .अशी मागणी आहे. या मागणीसाठीच आज मूक मोर्चा काढण्यात आला आहे. याची दखल न घेतल्यास भविष्यात विभाग स्तरावर आंदोलन केले जाईल त्यानंतर आझाद मैदानावरही राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी तीव्र आंदोलन करण्याच्या विचाराधीन असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
ग्रामसभा आयोजित करणे, तिची कार्यवाही पार पाडणे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते मात्र काही ठिकाणी ग्रामसभेदरम्यान वाद, धक्काबुक्की, मारहाण तसेच अन्य अनुचित प्रकार घडत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी पी एन पाटील यांना ग्रामसभेदरम्यान झालेल्या धक्काबुकीच्या घटनेनंतर त्यांचे दुःखद निधन झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून या घटनेने संपूर्ण ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी वर्गाला हादरून सोडले आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्दैवी घटना कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडू नये यासाठी शासनाने आता ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आज संपूर्ण राज्यात एक दिवशीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात युनियनचे अध्यक्ष प्रशांत वर्दम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मुक मोर्चा काढण्यात आला .
ग्रामसभा ही लोकशाहीची ताकद आहे आणि ग्रामसभेच्या व्यवस्थेला आमचा कोणताही विरोध नाही, मात्र ग्रामसभा राबवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेकडे दुर्लक्ष करून लोकशाही व्यवस्था प्रभावीपणे चालू शकत नाही अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. संवेदनशील किंवा वादग्रस्त ग्रामसभांच्या वेळी आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देणे ,अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, मारहाण किंवा धमकीचे प्रकार घडल्यास तातडीने कायदेशीर कार्यवाही करणे आणि ग्रामसभा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी ग्रामस्थ व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या भूमिकांची स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी. अशी मागणी करण्यात आली आहे .
प्रमुख मागण्या
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामसभेवेळी संरक्षण द्यावे
ग्रामसभांची संख्या कमी करावी
सभा अध्यक्षांनी नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देणे बंधनकारक करावे.
