Headlines

कुडाळ ते भोसले कॉलेज चरटा थेट एस.टी. बस सेवा सुरू करा…

नगरसेवक अभिषेक गावडे यांची आगार व्यवस्थापकांकडे मागणी..

⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील विद्यार्थ्यांना भोसले कॉलेज, चरटा (सावंतवाडी) येथे जाण्यासाठी थेट एस.टी. बस सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक तथा शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या कुडाळ, पिंगुळी, ओरोस, कळसुली, आंबरड आदी भागातील १०० पेक्षा जास्त विद्यार्थी यशवंतराव भोसले कॉलेज सिटी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, चरटा येथे शिक्षण घेत आहेत. कॉलेजची वेळ सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० अशी असताना, या मार्गावर थेट एस.टी. बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. थेट बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज खासगी वाहनांनी जास्त भाडे देऊन प्रवास करावा लागत असून, यामुळे त्यांची आर्थिक व वेळेची मोठी गैरसोय होत आहे. तसेच विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा व सुरक्षिततेचा विचार करून दोन फेऱ्या तातडीने सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कुडाळ बस स्थानक ते भोसले कॉलेज, सावंतवाडी (सकाळी ८:३० वाजता) व भोसले कॉलेज, सावंतवाडी ते कुडाळ (सायंकाळी ५:१५ वाजता) अशी मागणी करण्यात आली आहे.
ही बस सेवा लवकरात लवकर सुरू केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण नियमित व सुरक्षित होईल, असे नमूद करत नगरसेवक अभिषेक गावडे यांनी प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे वेधले आहे.
निवेदन देतेवेळी नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, इम्तियाज शेख, प्रथमेश कांबळी, भाई सडवेलकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page