भाजपच्या नगरसेवकांची पोलिसांकडे मागणी: निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी ता. ३१-: सावंतवाडी शहरात मागील एक-दोन दिवसांपासून MNGL या कंपनीचे नाव सांगून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार भाजपचे नगरसेवक तथा आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात केली आहे.
MNGL कंपनीच्या नावाने नागरिकांना मोबाईलवरून संपर्क साधून जुने कनेक्शन बंद करण्यासाठी अथवा नवीन कनेक्शन जोडण्यासाठी ओटीपी मागितला जात आहे. तसेच त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेऊन आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सर्वसामान्य तसेच ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन व्यवहाराबाबत असलेल्या मर्यादित माहितीचा गैरफायदा घेत अशा प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे आडिवरेकर यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सायबर क्राईमच्या माध्यमातून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित गुन्हेगारांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आडिवरेकर यांनी सावंतवाडी पोलिसांकडे केली आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम/डेबिट कार्डची माहिती अथवा इतर गोपनीय माहिती देऊ नये, तसेच संशयास्पद फोन किंवा संदेश आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.”
