शासनाकडून ४९ वस्तूंच्या संचाला मंजुरी..

⚡कुडाळ ता.३१-: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मूलभूत वस्तू संच सहाय्य योजनेला महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना शैक्षणिक साहित्याचा संच मिळणार आहे. शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख (अ.जा.) तथा श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
केंद्र शासनाने चार नवीन कामगार संहिता लागू केल्यानंतर सामाजिक सुरक्षा संहिता २०२० अंतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने विद्यमान शैक्षणिक सहाय्य योजनेत सुधारणा करून विद्यार्थ्यांना रोख स्वरूपातील मदतीऐवजी प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्य वस्तू स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली आहे.
या योजनेअंतर्गत पाण्याची बाटली, थर्मास, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोट, परीक्षेसाठी पॅड, लॉगबुक, ड्रॉईंग बुक, बॉलपेन बॉक्स, पेन्सिल बॉक्स, भूमिती कंपास, ऑईल पेस्टल्स, पोस्टर कलर्स, ब्रश संच, प्लास्टिक पट्टी, सोलर लॅम्प, कॅल्क्युलेटर, फोल्डिंग अभ्यास टेबल, दोन मार्करसह व्हाईट बोर्ड, गजराचे घड्याळ, शाळेची बॅग आणि किट बॅग अशा २२ प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. या संचामध्ये एकूण ४९ वस्तू विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीतील बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक गरजांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होणार असून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ होण्याची अपेक्षा प्राजक्त चव्हाण यांनी व्यक्त केली.
कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा करून शैक्षणिक साहित्य संच योजनेला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री नितेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांचे समस्त कामगारांच्या वतीने चव्हाण यांनी आभार मानले आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी श्रमिक कामगार संघटनेच्या सेवा संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
