Headlines

एकतेचा संदेश देत कुडाळकर धावले; ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे पाच किलोमीटरच्या एकता दौडीचे आयोजन:पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिली एकतेची शपथ..

⚡कुडाळ ता.३१-: राष्ट्रीय एकता दिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त कुडाळ येथे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ अर्थात पाच किलोमीटरच्या एकता दौडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘चला, एकतेचा संदेश देऊया… एक भारत, श्रेष्ठ भारत!’ आणि ‘एकतेसाठी धावूया… एकतेसाठी चालूया!’ या संदेशांसह आयोजित या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कुडाळ पोलीस ठाणे आणि सिंधुदुर्ग पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दौडीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच कुडाळ पोलीस ठाण्याच्या मैदानावर नागरिकांची गर्दी झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नायोमी साटम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. सहभागींची नावनोंदणी आणि वॉर्मअप झाल्यानंतर पोलीस बँडच्या राष्ट्रगीताच्या धूनने वातावरणात उत्साह निर्माण झाला.
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नायोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या हस्ते झेंडा दाखवून दौडीला सुरुवात करण्यात आली. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कुडाळ पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस चौक, एसटी बसस्थानक, काळप नाका, राज नाका, एस. एन. देसाई चौक आणि पुन्हा कुडाळ पोलीस ठाणे असा या दौडीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मार्गावर सहभागींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असलेले रिफ्रेशमेंट पॉइंट उभारण्यात आले होते.
या एकता दौडमध्ये कुडाळसह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, महिला मंडळ, लायन्स क्लब, कुडाळ मॅरेथॉन टीम, सायकल क्लब, क्रिकेट क्लबचे सदस्य आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
दौड पूर्ण झाल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याच्या मैदानावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दौडीतील प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नायोमी साटम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. सहभागी मान्यवर आणि नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस निरीक्षक विकास बडवे, कुडाळ मॅरेथॉनचे डॉ. जी. टी. राणे, सायकल क्लबचे गजानन कांदळगावकर, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोरगावकर, लायन्स क्लबच्या अध्यक्षा स्नेहा नाईक, सचिव शोभा माने यांच्यासह पत्रकार, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page