३ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज; जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ७० टक्के पदांना प्राधान्य
सिंधुदुर्गनगरी, ता. १ : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भरतीसाठी गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून, गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
शासनाने नव्याने निर्धारित केलेल्या निवड निकषानुसार ही भरती प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. एकूण ६७ पदांपैकी ७० टक्के पदांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून, उर्वरित ३० टक्के पदांसाठी जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवारांचा विचार केला जाणार आहे.
या भरती परीक्षेसाठी उमेदवारांना जीएसटीसहित ९०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षा शुल्क ऑफलाइन पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील खात्यावर भरता येईल. तसेच बँकेच्या कोणत्याही शाखेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
एनईएफटी, आयएमपीएस किंवा अकाउंट ट्रान्सफरद्वारे शुल्क भरता येणार असून, त्याचा ट्रान्झॅक्शन आयडी अर्जात नमूद करून काऊंटर पार्ट अथवा पैसे भरल्याचा फोटो/स्क्रीनशॉट अपलोड करणे आवश्यक आहे. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणेही अनिवार्य आहे.
उमेदवारांनी केवळ बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in� या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरण्यापूर्वी भरतीची जाहिरात व सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता व इतर माहिती अचूकपणे नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज भरताना काही अडचण आल्यास TCS संस्थेच्या ७९९६१०४१११ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
