थकीत देयके तातडीने देण्याची रूपेश पावसकर यांची मागणी:जुन्या बिलांअभावी कंत्राटदारांची नवी पाणीटंचाईची कामे रखडण्याची शक्यता..

⚡कुडाळ ता.३१-: जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत यापूर्वी पूर्ण केलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अद्याप कंत्राटदारांना मिळालेली नाहीत. त्यामुळे जुन्या कामांची बिले मिळाल्याशिवाय नवीन कामे हाती घेणार नसल्याची भूमिका काही कंत्राटदारांनी घेतल्याने पाणीटंचाई निवारणाच्या कामांसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन नवीन कामांचे कंत्राटदारांना वाटप करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी पूर्ण केलेल्या कामांची बिले प्रलंबित असल्याने नवीन कामे सुरू करण्याबाबत कंत्राटदारांमध्ये अनास्था असल्याचे खासगीत सांगितले जात आहे. कंत्राटदारांनी नवीन कामे सुरू करण्यास टाळाटाळ केल्यास पाणीटंचाई निवारणाची कामे रखडू शकतात. परिणामी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य रूपेश अशोक पावसकर यांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. तसेच नव्याने मंजूर व वाटप करण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाची कामे लवकरात लवकर सुरू होतील, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी पावसकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची प्रत माहिती व योग्य कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनाही पाठविण्यात आली आहे. आता प्रशासन या प्रश्नावर काय निर्णय घेते आणि पाणीटंचाई निवारणाच्या कामांना कितपत गती मिळते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
