Headlines

“आंबोली मंडलातील एकाही शिवसैनिकाचा भाजपमध्ये प्रवेश नाही…

भाजपने प्रवेश केलेल्यांची नावे, पदे व राजकीय ओळख जाहीर करावी; उगाचच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये,दिनेश गावडे..

⚡सावंतवाडी, ता. ३१-: आंबोली मंडलातील एकाही शिवसेना पदाधिकाऱ्याने अथवा निष्ठावंत शिवसैनिकाने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. भाजपने ज्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचा दावा केला आहे, त्यांचा शिंदे शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे पक्षप्रवेशाची घोषणा करताना संबंधित व्यक्तीचे नाव, शिवसेनेतील पूर्वीचे पद आणि राजकीय स्थान स्पष्ट करावे, उगाचच स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये, असा टोला शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांनी भाजपला लगावला.

आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली आंबोली मंडलातील काही शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, या प्रवेश केलेल्या शिवसैनिकांची नावे, शिवसेनेतील त्यांची पदे तसेच राजकीय ओळख याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी हा खुलासा करावा लागत असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. आमच्या शिवसेनेतील एकाही पदाधिकाऱ्याने अथवा निष्ठावंत शिवसैनिकाने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला किंवा शिवसेनेत फूट पडली, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. पक्षप्रवेश म्हणजे नेमके काय आणि पक्षप्रवेश कोणत्या पद्धतीने घ्यायचा असतो, हे लवकरच मित्रपक्षाला समजेल, असा सूचक इशाराही गावडे यांनी दिला. केवळ राजकीय वातावरण निर्मितीसाठी शिवसेनेला धक्का बसल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून जनतेचे मनोरंजन करू नये. भाजपने पक्षप्रवेशाची घोषणा करताना प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे, त्यांची पूर्वीची राजकीय पदे आणि पक्षातील भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही दिनेश गावडे यांनी केली. दरम्यान, भाजपने प्रवेश दिल्याचा दावा केलेले कार्यकर्ते नेमके कोण, त्यांचा शिवसेनेशी नेमका संबंध काय आणि त्यांच्याकडे शिवसेनेत कोणती पदे होती, याबाबत आता भाजपकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.”

You cannot copy content of this page