अग्निशमन टाकीच्या जागेवरून महाविकास आघाडीचा आक्षेप:नवीन जागा निश्चित होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे आदेश..

⚡कुडाळ ता.३१-: कुडाळ येथील महिला व बालरुग्णालयात अग्निशमन यंत्रणेसाठी पाण्याची साठवण टाकी उभारण्याच्या कामासाठी निवडण्यात आलेल्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे सीएसआर निधीतून सुमारे ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या इमारतीला धोका निर्माण झाला असून, रुग्णालयातील पार्किंगची जागाही बाधित झाल्याचा आरोप कुडाळ तालुका महाविकास आघाडीने केला आहे.
या प्रकरणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महिला व बालरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेलंग यांची भेट घेऊन कामाच्या नियोजनाबाबत जाब विचारला.
महिला व बालरुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेसाठी आवश्यक पाण्याच्या साठवण टाकीच्या बांधकामासाठी ३ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ३० लाख ८५ हजार ९५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा (एमजीपी) विभागाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला.
टाकीच्या फाउंडेशनसाठी खोदण्यात आलेला खड्डा ऑक्सिजन प्लांटच्या इमारतीलगत असल्याने या इमारतीच्या पायऱ्या खड्ड्यात कोसळल्या आहेत. त्यामुळे सुमारे ५० लाख रुपये खर्चून उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच टाकीच्या बांधकामासाठी निवडलेल्या जागेमुळे रुग्णालयाची पार्किंग व्यवस्था कायमस्वरूपी बाधित होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.
यावेळी डॉ. तेलंग यांनी एमजीपीच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी तीन पर्यायी जागा दाखविण्यात आल्या होत्या. मात्र, भविष्यात रुग्णालयाला होणाऱ्या अडचणींचा विचार न करता कंत्राटदाराला काम करणे सोयीचे जावे, या दृष्टीने सध्याची जागा निवडण्यात आल्याचे सांगितल्याचा दावा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता एमजीपी विभागाचे अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन टाकीसाठी नवीन जागा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराने बांधकामाचे काम बंद ठेवावे, असे आदेश डॉ. तेलंग यांनी दिले.
यावेळी कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर संघटक सुशील चिंदरकर, कुडाळ तालुका शिवसेना प्रवक्ते बाळा पावसकर आणि काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तरबेज शेख उपस्थित होते.
