रस्त्याच्या दुतर्फा गटांरांवर असलेला झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा त्वरित हटवा

*नागरिकांमधून मागणी*

*💫मालवण दि.०३-:* तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मालवण शहरात जागोजागी कोसळली, मोडून पडलेली शेकडो झाडे नगरपालिकेबरोबरच सजग नागरिकांनी बऱ्यापैकी हटविल्यानंतर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला या झाडांचे ओंडके, फांद्या व मोठ्या प्रमाणावरील पालापाचोळा पडून असल्याने काही गटारांवर असलेल्या झाडाच्या फांद्या व पालापाचोळा हा पावसाळ्यात नगरपालिकेबरोबरच नागरिकांचीही डोकीदुखी ठरणार असल्याने नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा गटारांवर असलेल्या झाडांच्या फांद्या,पालापाचोळा त्वरित हटवाव्यात नाहीतर पावसाळ्यात मालवणातील बहुतांश रस्ते जलमय होण्यास वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटू लागली आहे तौक्ते वादळाचा मोठा तडाखा किनारपट्टी भागाला बसला. मालवण शहरात वादळामुळे सर्वाधिक नुकसानी होऊन शेकडो झाडे जमीनदोस्त झाली. शहरातील बहुतांशी रस्त्यांवर झाडे व माड कोसळून रस्ते बंद झाले होते. तर आंबे, पालापाचोळा, नारळ, माडाची झावळे यांचा खच सर्वच रस्त्यांवर पडला होता. नगरपालिकेबरोबरच नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर कोसळलेली झाडे तोडून हटवित मार्ग खुला केला आहे. मात्र या झाडांचे तोडून ठेवलेले मोठंमोठे ओंडके, फांद्या, लाकडे अद्यापही रस्त्यांच्या दुतर्फा पडलेली आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याने त्यांच्या लाकडाचे करायचे तरी काय हा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. झाडांचा मोठ्या प्रमाणावरील पालापाचोळा देखील रस्त्यांच्या दुतर्फा तसेच गटारांमध्ये साचून राहिला आहे. जून महिना सुरू झाला असून काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार असल्याने पालापाचोळ्याने भरलेली गटारे साफ करणे व पालपाचोळ्याची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे असून नगरपालिकेने हा पालापाचोळा न जाळता या पालापाचोळ्या पासून सेंद्रिय खत निर्मितीकडेही लक्ष दिल्यास ते फायदेशीर ठरेल असे मतही काही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे त्याचा योग्य वापर होऊ शकतो. मालवण नगरपालिकेने गटारावरील झाडे, पालापाचोळा हटवून गटारे वेळीच मोकळी न केल्यास पावसात गटारे तुंबून पावसाचे पाणी रस्त्यांवरच तुंबून रस्ते जलमय होण्याची भीती असून नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील हा अडसर दूर करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे

You cannot copy content of this page