Headlines

खोदाई दुरुस्तीचा खर्च कोणी करावा या प्रश्नावरून मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडले !

​मालवण (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय मालवण येथे विद्युत वितरण, ग्राहक पंचायत शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांची संयुक्त ‘ऊर्जा मित्र बैठक’ पार पडली. ​या बैठकीत ग्राहकांनी मालवण शहरातील रखडलेल्या भूमिगत वीज वाहिनीचे कामाबाबत प्रश्न उपस्थित केले असता या कामासाठी होणाऱ्या रस्ता खोदाईनंतर खोदाई दुरुस्तीपोटी खर्च करावयाची रक्कम कोणी द्यावी या प्रश्नावर वीज वितरण कंपनी, मालवण नगरपालिका व संबंधित ठेकेदार यांच्यात अद्याप कोणताही निर्णय होऊ न शकल्याने हे काम रखडल्याचे स्पष्ट झाले.

या बैठकीत उपस्थित वीज ग्राहकांनी विविध वीज समस्या मांडल्या. या बैठकीत प्रामुख्याने प्रत्यक्ष शेतीपंप उपलब्ध असतानाही आलेले भरमसाठ वीज बिल, नवीन घरगुती वीज जोडणीसाठी सर्व्हिस लाईन मिळण्याबाबत येणाऱ्या अडचणी, ज्येष्ठ वीज ग्राहकांना आलेली अवाजवी व भरमसाठ बिलांची रक्कम हे प्रश्न मांडण्यात आले. ​उपस्थित सहाय्यक अभियंत्यांनी या सर्व तक्रारींची गांभीर्याने नोंद घेतली. या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र मालवण शाखा सहसंघटक वफा खान यांनी आपली नाराजी व्यक्त करत “यातील अनेक तक्रारी वारंवार व पुनरावृत्तीने समोर येत आहेत. महावितरण प्रशासनाने यावर आता विलंब न लावता त्वरित आणि कायमस्वरूपी कार्यवाही करावी, असे त्या म्हणाल्या.

​बैठकीदरम्यान मालवण शहरातील रखडलेल्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या कामाबाबत प्रश्न विचारला असता महावितरणच्या अभियंत्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. ​महावितरणने मालवण नगरपालिकेकडे सादर केलेल्या अहवालानंतर, नगरपालिकेकडून खोदाई आणि दुरुस्तीपोटी ७ कोटी १५ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. ​मात्र, प्रत्यक्ष नियमानुसार महावितरणचा ठेकेदार जेवढी खोदाई करेल, त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी आणि तरतूद ठेकेदाराचीच असते.
नगर​पालिकेला एवढी मोठी रक्कम भरणे महावितरणला शक्य नसल्याने हे काम सध्या रखडले आहे. ​यावर तोडगा काढण्यासाठी आणि समोरासमोर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी दि. २ सप्टेंबर रोजी मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.

​या ‘ऊर्जा मित्र बैठकी’ला महावितरण व ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर सहाय्यक अभियंता प्रथमेश मयेकर, ग्रामीण सहाय्यक अभियंता राहुल केकान, ​ग्राहक पंचायत अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष प्रताप बागवे, सहसंघटक वफा खान, सहसंघटक महेश काळसेकर, सचिव निळकंठ मालणकर, कोषाध्यक्ष सुरेल परब, जिल्हा सदस्य प्रमोद मोहिते, वीज ग्राहक सदाशिव आरोलकर, हेमंत कोचरेकर, शिशुपाल राणे, सुशांत तायशेटे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page