२५० हून अधिक नमुने संकलित:व्यापारी महासंघ व हॉटेल संघटना यांचा उपक्रम..
⚡कुडाळ ता.२०-: अन्नसुरक्षा मानकांच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यात अन्नपदार्थ व पाण्याची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, कुडाळ तालुका व्यापारी संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.
या मोहिमेसाठी मिरज येथील एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे कर्मचारी कुडाळ येथील व्यापारी महासंघाच्या कार्यालयात दाखल झाले होते. कुडाळ तालुक्यातील अन्नपदार्थाशी संबंधित व्यावसायिकांकडून पाणी व विविध अन्नपदार्थांचे २५० हून अधिक नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले.
अन्नसुरक्षा नियमांनुसार हॉटेल व्यावसायिकांसाठी पाणी व अन्नपदार्थांची तपासणी करणे आवश्यक असते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांना कोल्हापूर, पुणे, मिरज, मुंबई किंवा ठाणे येथे नमुने तपासणीसाठी पाठवावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात होत होता.
व्यावसायिकांची ही अडचण लक्षात घेऊन संबंधित तीनही संघटनांनी संयुक्त पुढाकार घेत मिरज येथील एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांना कुडाळमध्येच पाचारण केले. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने नमुने संकलित करून तुलनेने कमी खर्चात तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.
या उपक्रमामुळे कुडाळ तालुक्यातील हॉटेल चालक व अन्नपदार्थ व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष पी. डी. शिरसाट, महासंघाचे उपाध्यक्ष अवधूत शिरसाट, खजिनदार नंदन वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक, अमित सुखी तसेच कुडाळ तालुका व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
