Headlines

आयुष ओपीडी सुरू करा; अन्यथा स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलन…

नगरसेवक देव्या सूर्याजी:५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करा..

सावंतवाडी : आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सावंतवाडी शहरात मंजूर झालेल्या ओपीडी संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे‌. तसेच ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामात कसूर केलेल्या कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करण्यासह पाणी पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांचे तात्काळ निलंबन करण्यासह प्र. मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी नगरसेवक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी केली आहे. अन्यथा, १५ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रांताधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींना त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, सावंतवाडीतील रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय, भारत‌ सरकारची ओपीडी मंजूर झाली आहे. समाजमंदिर येथील जागेत ती एवढ्यात सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अ‌द्याप प्रशासनाकडून आयुष मंत्रालयास आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्णांच्या संवेदनशील विषयात प्रशासनाचा हा असंवेदनशीलपणा निषेधार्ह आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२६ ला ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा होण्यापूर्वी ही ओपीडी सुरु होण्यासाठी सकारात्मक निर्णय नगरपरिषद प्रशासनाकडून घेतला न गेल्यास स्वातंत्र्य दिनी प्रशासनाच्या विरोधात सावंतवाडी नगरपरिषदेच्या इ‌मारती समोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी दिला आहे.‌

तसेच प्र. मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली करून पुर्णवेळ मुख्याधिकारी सावंतवाडी न.प. ला देण्यात यावा. तर ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कंत्राटदाराकडून झालेल्या त्रूटी व कामातील दर्जा यावर बोट ठेवून त्याला तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच पाणी पुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशीही मागणी श्री. सुर्याजी यांनी केली आहे. १५ ऑगस्ट पुर्वी याबाबत कार्यवाही न झाल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल व त्यावेळी कोणत्याही प्रकारची घटना, दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष जबाबदार राहतील असा इशारा नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page