मोपा व चिपी विमानतळाची जबाबदारी..
⚡कुडाळ ता.०६-: शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या सर्वसाधारण सभेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते काका कुडाळकर यांची युनियनच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यावर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच चिपी विमानतळ येथील युनियनची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील ‘द हिल्टन’ हॉटेलमध्ये झालेल्या सभेला उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, आमदार दिलीप लांडे, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्यप्रमुख मंगेश चिवटे, युनियनचे जनरल सेक्रेटरी कुणाल सरमळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काका कुडाळकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सभेत युनियनच्या नव्या पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली.
संघटनेच्या वतीने कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने सुरू असलेल्या कार्याचा उपस्थित मान्यवरांनी गौरव केला. भविष्यातही संघटनेला खंबीर पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शिवसेना युवा नेतृत्व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले.
जनरल सेक्रेटरी कुणाल सरमळकर यांनी संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेत, अवघ्या एका वर्षात युनियनची सदस्यसंख्या पाच हजारांहून अधिक झाल्याचे सांगितले. आगामी काळात देशातील सर्व विमानतळांवर शिवसेना पुरस्कृत या युनियनचे जाळे अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
